तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराला मारहाण, नेमके काय झाले, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

दुपारी चारच्या सुमारास येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालना समोर बेलंबा येथील युवक गोंधळ घालत होते. नायब तहसीलदार बाबूराव रूपनर आपल्या दालनातून बाहेर आले.

परळी वैजनाथ (जि. बीड) - येथील तहसील कार्यालयात फेरफार नकलेवरून नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांना चार युवकांकडून दारू पिऊन मारहाण झाल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी लिपिक सूरज शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तो रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, तहसील प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आहे. असे असताना शहरात मात्र अधिकारी वर्गाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता.28) दुपारी चारच्या सुमारास येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालना समोर बेलंबा येथील युवक गोंधळ घालत होते. नायब तहसीलदार बाबूराव रूपनर आपल्या दालनातून बाहेर आले. त्यांनी या युवकांना विचारले असता आमच्या आताच्या आता आमच्या फेरफारची नक्कल पाहिजे आहे आणि तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? असे म्हणत नशेतील चार युवकांनी श्री. रूपनर यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. चष्मा फुटला, शर्ट फाडले. विशेष म्हणजे श्री. रूपनर हे अपंग आहेत. तहसीलमधील कर्मचारी व इतर नागरिकांनी सोडवा सोडव केल्याने पुढील अनर्थ टळला. शहराच्या इतिहासात तहसील कार्यालयात एकाद्या अधिकाऱ्याला मारहाण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात फोन केल्याने पोलिसांनी तत्काळ तहसील मध्ये येऊन तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले
असून शिंदे यांच्या फिर्यादीवरून बेलंबा येथील चार युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. 

Video- काय करावं काही सुचत नाही...श्रमाची साधना पुढे न्यायची असते

२० लाखांची बॅग पळवली  

अंबाजोगाई - शहरातील नवीन न्यायालयासमोर गुरुवारी (ता. २८) सकाळी एका जागेच्या व्यवहारातील २० लाख रुपये असलेली पैशाची बॅग तक्रारदार स्कुटीवर घेऊन जात होता. या वेळी व्यवसायासाठी लागणारे तिकीट घेण्यासाठी तो थांबला असता स्कुटीला अडकवलेली २० लाख रुपये असलेली बॅग अज्ञात इसमाने लंपास केली. या प्रकरणी येथील शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. 
येथील मुळ रहिवासी व सध्या पुण्यात स्थायीक असलेल्या बांधकाम अभियंत्याने अंबाजोगाईत जागा घेतली होती. त्या जागेच्या व्यवहारातील पैसे जागा मालकाला द्यावयाचे होते. त्यामुळे अभियंत्याच्या सांगण्यावरून तक्रारदार बालाजी हरिभाऊ गोरे हे पैसे आणण्यासाठी अभियंत्याच्या बंधूकडे गेले.

सात दिवसानंतर नागरिकांना दिलासा.....कशामुळे ते वाचा

परंतु सदरील पैसे त्यांनी सुरक्षेसाठी एका व्यापाऱ्याकडे ठेवले होते. त्यानुसार बालाजी गोरे हे सकाळी त्या व्यापाऱ्यांकडून पैश्याची बॅग घेऊन स्कुटीने (एम.एच.४४, यु ७७७७) जात होते. पैसे नेताना खरेदी व्यवहारासाठी स्टॅंम्प तिकिट लागते हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार नवीन कोर्टासमोरील स्टॅंप विक्रेत्याकडे जवळच स्कुटी लाऊन थांबले होते. हे तिकिट घेईपर्यंत अज्ञात इसमाने ती बॅग लंपास केली. बॅग चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार बालाजी गोरे यांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे या करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News at Parli