esakal | तरुणीच्या पोटातून काढला बारा किलो मांसाचा गोळा
sakal

बोलून बातमी शोधा

critical surgery

तरुणीच्या पोटातून काढला बारा किलो मांसाचा गोळा

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर: एका बावीसवर्षीय तरुणीच्या पोटात वाढलेला बारा किलोचा मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची व अतिशय अवघड शस्त्रक्रिया केली. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांती केंद्रे व त्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया करून तरुणीला जीवदान दिले. तरुणीला अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. तिची डॉ. केंद्रे यांनी प्राथमिक तपासणी केली. सोनोग्राफी, सीटी स्कॅनसह आवश्यक तपासण्या केल्यानंतर अंडाशयात मांसाची मोठी गाठ असल्याचे निदान झाले.

अशा स्वरूपातील गाठ अधिक काळ पोटात राहणे धोक्याचे असल्याने नातेवाइकांना आजाराबद्दल माहिती देऊन डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. केंद्रे यांनी तरुणीवर शस्त्रक्रिया करून अंडाशयातील बारा किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढला. सव्वा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेसाठी डॉ. केंद्रे यांना डॉ. आरती माने, डॉ. प्रीती कांबळे व भूलतज्ज्ञ डॉ. टी. के. कारंडे यांनी साह्य केले. पुढील
उपचारानंतर तरुणीला रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. सध्या तिची प्रकृती चांगली असून शस्त्रक्रियेपूर्वी होत असलेला त्रासही कमी झाल्याचे डॉ. केंद्रे यांनी सांगितले.

हेही वाचा: २१ नखी जिवंत कासव अन् कुत्रा न दिल्याने लग्न मोडले!

हार्मोन्सचे प्रमाण कमीजास्त झाल्याने, विषाणू संसर्गाने व शरीरातील अन्य विकारामुळे जन्मजात, बालवयापासून ते वृद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत महिलांना पोटात गाठ वाढण्याचा आजार होऊ शकतो. अशा गाठी अंडाशय, गर्भाशय व आतड्यात वाढतात. त्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो किंवा होतही नाही. उलट्या, पोटातील गाठीला पीळ पडल्यास ताप, मासिक पाळीत अडचणी, अति रक्तस्राव आदी लक्षणे दिसतात. दहा ते २५ वर्षे वयोगटात अंडाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. दुर्लक्ष झाल्यास कालांतराने गाठीचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. यामुळे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करणे योग्य.
- डॉ. कांती केंद्रे, एमआयटी, लातूर.

loading image