कोरोनातली उधळपट्टी, बीडमध्ये सव्वासहा कोटींचा लखलखाट

Beed Corona Updates
Beed Corona Updates

बीड : कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन लागल्याने सर्वच घटकांच्या डोळ्यासमोर अंधार पडला. पण, या काळात प्रशासन आणि पुढारी ठेकेदारांनी कोरोनाच्या नावाखाली सहा कोटी २० लाख रुपयांचा वीजेचा लखलखाट केला आहे. विशेष म्हणजे तीन कोटी आठ लाख रुपयांचे दहा जनरेटरसाठीही आरोग्य विभागाने पैसे घेतले आहेत. यातील काही ठिकाणी निश्चितच विद्युतीकरणाची गरज मान्य करावी लागेल. पण, अनेक कार्यान्वित असलेल्या आरोग्य संस्थांच्या व इतर शासकीय विभागांच्या नियमित वापरतील इमारतींमध्येही विद्युतीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

यापूर्वी सदर ठिकाणी अंधारात काम होत होते का, असा प्रश्न या निमित्ताने पडत आहे.कहर म्हणजे काही आरोग्य संस्थांमध्ये वीज जनित्र (जनरेटर) बसविणे गरजेचे असले तरी एकाच ठिकाणी तीन तिन जरनेटरसाठी पैशांची मागणी आणि तरतुद केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे जनित्र आणली का, विद्युतीकरण केले का नुसते कागदे काळे करुन ठेकेदारांचे खिशे भरले आणि त्यातला हिस्सा शासकीय यंत्रणेच्या खिशात आला, असा सवाल उपस्थित होत आहे. या काळात दहा जनरेटरच्या खरेदीसाठी आरोग्य विभागाला निधी मिळाला आहे.


कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सर्वच घटक भितीच्या सावटाखाली होते. तसेच लॉकडाऊनमुळे सार्वजनिक आणि कार्यालयांतील लोकांचा वावरही बंद होता, याचाच फायदा घेत काही शासकीय यंत्रणा आणि राजकीय ठेकेदारांनी कोरोनाच्या नावाखाली शासकीय तिजोरीची अलगद सफाई केली. यातील एकेक किस्से आता हळुहळु बाहेर येताहेत. कोरोना विषाणू संसर्गावरील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक व्हेंटीलेटर्स, औषधींचा पुरवठा करणाऱ्या शासनाने कंत्राटी तत्वार भरलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे वेतनही अदा केले. तरीही बीड जिल्ह्यात या काळात ५८ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

विशेष म्हणजे जिल्हा वार्षिक योजनेतून सढळ निधी मिळालेला असताना पुन्हा गौण खनिज, आपत्ती निवारण विभागाचा निधीही या कामासाठी वळविला आहे.रंगरंगोट्या, दुरुस्त्या, सीसीटीव्ही, विद्युतीकरण अशा कामांच्या नावाखाली अवाजवी किंमतीच्या वस्तू आणि नको तिथे खर्चाचे प्रकार घडले आहेत. यातीलच आता विद्युतीकरणासाठीही तब्बल सहा कोटी २० लाखांचा निधी जिल्हा नियोजन विभागाने आरोग्य विभागाला वर्ग केल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोनाच्या निमित्ताने काही ठिकाणी नवीन वीज उपकरणे, जोडण्या आवश्यक होत्याही पण अनेक ठिकाणचे आकडे पाहून ही जणू ठेकेदारांचे खिशे भरण्याची कसरत केल्याचेच दिसत आहे.

मग काय, अंधारात कामे सुरु होती का

दरम्यान, विद्युतीकरणासाठी खर्च केलेल्या सहा कोटी २० लाखांच्या कामांच्या यादीतील कामे पाहीली तर डोळे दिपून जातील. आरोग्य विभागाच्याही कार्यान्वित संस्था आणि विलगीकरण कक्षासाठी आरोग्य विभागाने ताब्यात घेतलेल्या शासनाच्या इतर पण कार्यान्वित संस्थांमध्येही विद्युतीकरणासाठी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. यात जिल्हा रुग्णालयात केलेल्या आयसोलेशन वार्ड, प्रयोग शाळा, शंभर खाटांची इमारत, कर्मचारी - अधिकाऱ्यांची राहण्याची सोय केलेले मुलींचे वसतीगृहाचाही समावेश आहे. मग, यापूर्वी काय अंधारात उपचार व कारभार सुरु होते का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.  नुसते विद्युतीकरण कामासाठी तब्बल पाऊण कोटी (७४ लाख) रुपये तर नवीन रोहित्र आणि उपकेंद्रासाठी पाच कोटी ४६ लाखांचा समावेश आहे.
 

दोन वर्षांपूर्वीच ६५ लाख; शंभर खाटांची इमारतही नवीच तरीही

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाला दोनच वर्षांपूर्वी केवळ विद्युतीकरणासाठी ६५ लाखांचा निधी मिळाला होता. तरीही आता ७४ लाख वरुन खर्च केले आहेत. विशेष म्हणजे यातील शंभर खाटांची इमारतही नवीच आहे. त्यावरही विद्युतीकरणासाठी १३ लाख ५२ हजारांचा खर्च आहे. तर, प्रयोगशाळेसाठीही तब्बल १७ लाख ३० हजारांच्या विद्युतीकरणाचा खर्च केला आहे. आता या खर्चाच्या आकड्यांचे प्रयोग पाहून डोळेच फाटून जातील असे दिसते.

यादीत पुन्हा पुन्हा तीच नावे

दरम्यान, विद्युतीकरण, ट्रान्सफार्मर आणि जनित्र बसविण्यासाठी खर्च केलेल्या सहा कोटी २० लाख रुपयांच्या यादीत अनेक वेळा त्याच - त्याच संस्थेत निधीची मागणी व तरतुद केल्याची नोंद आहे. उदाहरण म्हटले तर जिल्हा रुग्णालयाची ओपीडीसाठी तब्बल १९ लाख ५७ हजारांचे जनीत्र तर इथेच अंतररुग्ण विभागात पुन्हा १६ लाख ८२ हजारांचे जनित्र संच आहे. येथीलच व्हीआरएलडी लॅबमध्ये पुन्हा १० लाख ३३ हजारांची तरतुद आहे. असाच प्रकार लोखंडी (ता. अंबाजोगाई) येथील एकत्रीतच असलेल्या पण स्त्री रुग्णालय, वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य केंद्र व परिचर्या प्रशिक्षण केंद्र इमारतींमधील विद्युतीकरण कामांबाबतही आहे. अंबाजोगाईच्या स्वारातीमधील जनरेटरची नोंदही दोन ठिकाणी आहे.

अशी आहे विद्युतीकरण खर्चाची यादी
- अंबाजोगाईच्या स्वारातीमधील आयसोलेशन वार्डसाठी जनरेटर : २४ लाख १२ हजार.

- अंबाजोगाईच्या स्वारातीमधील कोविड वार्ड व व्हीआरएलडी लॅबसाठी जनरेटर : ११ लाख ९० हजार.

- अंबाजोगाईच्या स्वारातीमधील आयसोलेशन वार्डसाठी जनरेटर सेट : २४ लाख ९८ हजार.

- बीडच्या जिल्हा रुग्णालयातील ओपीडी इमारतीत जनरेटर सेट : १९ लाख ५७ हजार.

- बीडच्या जिल्हा रुग्णालयातील आयपीडीमध्ये जनरेटर सेट : १६ लाख ८२ हजार.

- बीडच्या जिल्हा रुग्णालयातील व्हीआरएलडी लॅबसाठी जनरेटर : १० लाख ३३ हजार.

- बीड जिल्हा रुग्णालयातील कक्ष तीन व आयसोलेशन वार्डचे विद्युतीकरण : सात लाख २१ हजार.

- बीड जिल्हा रुग्णालयातील ओपीडीचे विद्युतीकरण : आठ लाख २४ हजार.

- बीड जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेचे विद्युतीकरण : १७ लाख ३० हजार

- बीड जिल्हा रुग्णालयातील शंभर खाटांच्या इमारतीचे विद्युतीकरण : १३ लाख ५२ हजार.

- बीडला कोरोना उपचार करणारया अधिकारी कर्मचाऱ्यांच्या होस्टेलचे विद्युतीकरण : तीन लाख १९ हजार.

- लोखंडीच्या स्त्री रुग्णालयात जनरेटर सेट : ३९ लाख ८९ हजार.
- लोखंडीच्या वृद्धव व मानसिक आजार केंद्रात जनरेटर सेट : ४५ लाख १२ हजार.

- लोखंडीच्या एएनएम प्रशिक्षण केंद्रात जनरेटर सेट : २० लाख ६४ हजार.

- लोखंडीच्या वृद्धत्व व मानसिक आजार केंद्रात ट्रान्सफार्मरसह कामे : ६३ लाख ४५ हजार.
- लोखंडीच्या एएनएम प्रशिक्षण केंद्रात ट्रान्सर्फासह कामे : ३४ लाख ५५ हजार.

- लोखंडीच्या स्त्री रुग्णालयात ट्रान्सफार्मर व कामे : ५३ लाख ७९ हजार.

- लोखंडीच्या विविध आरोग्य संस्थांसाठी ३३/११ केव्ही उपकेंद्र उभारणे : एक कोटी ३१ लाख ५९ हजार.

- परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात जरनेटर सेट : १९ लाख ७२ हजार.

- प्राथमिक आरोग्य केंद्रांना जनरेटर सेट : ४९ लाख.

- गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जनरेटर : आठ लाख ७५ हजार.

- आष्टीच्या ट्रामा केअर सेंटरसाठी जनरेटर : आठ लाख ७५ हजार.

- तेलगावच्या ट्रामा केअर सेंटरसाठी जनरेटर : आठ लाख ७५ हजार.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com