जालन्यात कोरोनाने घेतला तिघांचा बळी

महेश गायकवाड
Thursday, 2 July 2020

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी वाढत असताना बुधवारी (ता. एक) शहरातील तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात जिल्ह्यात २७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जालना -  शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी वाढत असताना बुधवारी (ता. एक) शहरातील तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात जिल्ह्यात २७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, कोविड हॉस्‍पिटलमधील नऊजणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात पसरलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी जालना शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मंगळवारी जिल्‍ह्यात ३१ रुग्णांची भर पडल्यानंतर बुधवारी (ता. एक) सकाळी २७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील विविध भागांतील आहेत.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये दानाबाजार येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश असून ती मधुमेह, रक्तदाब व हृदयाच्या आजाराने त्रस्‍त होती. अत्यवस्थ स्थितीत ता. २९ जून रोजी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात या महिलेस दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण शहरातील बुऱ्हाणनगरमधील ४५ वर्षीय पुरुष असून त्यास श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने तो ता. २९ जून रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सकाळी पावणेदहा वाजता त्याचा मृत्यू झाला. तर तिसरा रुग्ण शहरातील अंबर हॉटेल परिसरातील ७० वर्षीय पुरुष असून, तीन आठवड्यांपूर्वी त्याच्या मूत्राशयाच्या कर्करोगावर शस्‍त्रक्रिया करण्यात आली होती. श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला असून तीनही रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

जिल्ह्यात बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या २७ रुग्णांमध्ये जालना शहरातील बुऱ्हाणनगरमधील तीन, कसबा परिसर, गुरुगणेशनगर भागातील प्रत्येकी दोन, संभाजीनगर, जेपीसी बॅंक कॉलनी, कन्हैयानगर, औद्योगिक वसाहत, बालाजीनगर, मामा चौक परिसर, साईनगर, दानाबाजार, कादराबाद, तट्टूपुरा, निवांत हॉटेल परिसर, मिल्लतनगर, कालिकुर्ती, अंबर हॉटेल परिसर व नेहरू रोड येथील प्रत्येकी एक, अंबड तालुक्यातील एकलहेरा, रोहिलागड येथील प्रत्येकी एक, बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील एक आणि भोकरदन शहरातील रोकडा हनुमाननगर व तुळजाभवानीनगरमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. 

जालन्यातील आठजणांची कोरोनामुक्ती 

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांपैकी नऊजण बुधवारी बरे झाले. यात जालना शहरातील नाथबाबा गल्लीतील एक, वाल्मीकनगर व इंदेवाडीतील प्रत्येकी दोन, मंगळबाजारमधील तीन व्यक्तींचा समावेश आहे. तर जाफराबाद तालुक्यातील भारज येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of three corona patients in Jalna