हृदयद्रावक - पायी गावाकडे जाताना भुकेल्या ऊसतोड मजुराचा बीड जिल्ह्यात मृत्यू

निसार शेख 
Monday, 18 May 2020

धानोरा (ता. आष्टी) येथून एक किलोमीटर अंतरावरील अहमदनगर मार्गावरील एका पत्र्याच्या शेडमधून सोमवारी (ता.१८) दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी एक कुजलेल्या अवस्थेत ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

कडा (जि. बीड)  - ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. वाहने बंद असल्याने अनेक व्यक्ती शहराकडून गावी पायी निघाले आहेत. कडक उन्हाळ्यात पायी प्रवास करणाऱ्या अनेकांना पोटात अन्नाचा कण व पाणी न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. 

धानोरा (ता. आष्टी) येथून एक किलोमीटर अंतरावरील अहमदनगर मार्गावरील एका पत्र्याच्या शेडमधून सोमवारी (ता.१८) दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी एक कुजलेल्या अवस्थेत ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदरील माहिती अंभोरा पोलिसांना कळताच सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, सचिन दाभाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृताच्या कपड्यात असलेल्या चिठ्ठीतील मोबाईल क्रमांकावरून नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांचे नाव पिंटू मनोहर पवार असून ते धोपटे पोंडूळ (ता. मानवत, जि. परभणी) येथील असून, ऊसतोड कामगार असल्याचे सांगितले.

हेही वाचा - वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली   

मृत व्यक्ती ऊसतोडी संपल्यानंतर पुणे येथे त्याच्या भावाकडे राहत होता; परंतु लॉकडाउनमध्ये अडकल्यामुळे त्याला गावी जाता येत नव्हते. त्यामुळे तो पुणे येथून एक आठवड्यापूर्वी पायी गावी निघाला होता. चार-पाच दिवसांपूर्वी मृताने अहमदनगर येथून आपल्या घरी फोन करून मी गावी चालत येत असल्याचे सांगितले होते. वाटेत एकही हॉटेल उघडे नसल्याने पोटात अन्नाचा कण नसल्याने व पिण्यासाठी पाणीही नसल्याने ती व्यक्ती धानोरापासून जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये थांबली होती. एक आठवड्यापासून चालून-चालून थकल्याने व भुकेने व्याकूळ झालेल्या ऊसतोड मजुराला अखेर मृत्यूने गाठले. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

दरम्यान, चार दिवसांपासून मृतदेह एका जागेवर पडून राहिल्याने शरीर कुजून दुर्गंधी येत होती. ही माहिती काहींनी प्रशासनाला कळविली. यानंतर खुंटेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जोगदंड यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. सदरील व्यक्तीचा मृत्यू अतिचालणे व भुकेमुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. मृताच्या नातेवाइकांनी लॉकडाउनमुळे मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याचे सांगितल्याने त्याच्यावर धानोरा येथेच नातेवाइकांच्या परवानगीने अंभोरा पोलिस व धानोरा ग्रामपंचायतीकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a walking laborer in beed district