अरेरावी करणाऱ्या बॅंक व्यवस्थापकाच्या निलंबनासाठी शेतकरी संतप्त, आष्टीतील प्रकार

अनिरुद्ध धर्माधिकारी 
Tuesday, 24 November 2020

आष्टीत बॅंक शाखाधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी 

आष्टी (बीड) : कर्जप्रकरणांबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अरेरावी करून उडवाउडवीची उत्तरे देत गार्डमार्फत बॅंक शाखेबाहेर हाकलणाऱ्या स्टेट बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
निवेदनात म्हटले आहे, की कोरोना साथरोग व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पीककर्ज व शेतीकर्जासाठी शेतकरी आष्टी शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंक शाखेत मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. बॅंकेत दाखल केलेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी बॅंकेत वारंवार हेलपाटे मारून विचारणा करीत आहेत. मात्र, पीककर्ज नवे-जुने करून तीन-चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जरक्कम जमा झालेली नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बॅंकेत दाखल केलेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम कधी जमा होईल याची विचारणा करण्यासाठी कक्षात गेलेल्या शेतकऱ्यांना शाखाधिकारी यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरण्यात येत असून, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला. त्यामुळे शाखाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे; अन्यथा शनिवारी (ता. २८) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा शिवक्रांती युवा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर मुनीर बेग (डोईठाण), दादासाहेब गर्जे (हातोला), दत्तात्रेय तावरे (खानापूर), बाबासाहेब खामकर (हातोला), नवनाथ काळे, सोमनाथ काळे (जोगेश्वरी पारगाव) या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By Pratap Awachar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for suspension bank officer harassing farmers Ashti News