तब्बल 27 वर्षांनी भरला 'आठवणींचा वर्ग'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

तब्बल 27 वर्षांनी हा योग जुळून आला आणि आठवणींचा 'वर्ग' भरला. औचित्य होते ते 'देवगिरीयन ग्रुप'च्या स्नेहमिलनाचे. सर्वांनी एकमेकांची आपुलकीने विचारपूस करीत विद्यार्थीदशेतील घटना, आठवणी, गमतीजमतींना उजाळा दिला.

औरंगाबाद : कॉलेजजीवनाच्या 27 वर्षांनंतर देवगिरी महाविद्यालयातील कला शाखेतील त्यावेळचे विद्यार्थी आजचे जग विसरून पुन्हा 'आठवणींच्या वर्गा'त जमले. जुन्या आयुष्यात रमले. इतकेच नव्हे, तर आठवणींना उजाळा देताना समाजासाठी नवे काही करण्याची उमेद बाळगूनच या वर्गाबाहेर पडले.

वेगवेगळी विचारसरणी, वेगवेगळे क्षेत्र कॉलेजजीवनातही होते. आजही आहेत. तरी तेव्हाही एकत्र होतो आणि आजही एकत्र आहोत, हा मूलगामी संदेश जणूकाही आज भरलेल्या वर्गाने मागच्या आणि पुढच्या पिढीला दिला.

कधीकाळी कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या मित्रांची भेट व्यस्ततेमुळे तशी दुर्मिळच; पण तब्बल 27 वर्षांनी रविवारी (ता. आठ) 'हॉटेल जानकी'च्या सभागृहात वर्गमित्रांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम झाला. सुरवातीला अतुल दिवे यांनी "वो कागज की कश्‍ती, वो बारीश का पानी' या गझलेचे गायन केले. त्यामुळे उपस्थित सगळेच आठवणींत रममाण झाले.

आठवणी, गमतीजमतींना उजाळा

सर्वांनी एकमेकांची आपुलकीने विचारपूस करीत विद्यार्थीदशेतील घटना, आठवणी, गमतीजमतींना उजाळा दिला. यावेळी 'सकाळ'च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड म्हणाले, "आई-वडिलांसह माझ्या आयुष्यातील पहिल्या शिक्षकांपासून ते आजपर्यंत आयुष्यात आलेल्या सर्व गुरुजनांचा जसा मार्गदर्शक म्हणून उपयोग झाला तसाच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या मित्रांचाही झाला. आज इथे जमलेल्या त्या मित्रांमध्ये मी आहे याच्याइतका आनंद असूच शकत नाही,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बाप रे - घाटीत या रुग्णांचे अर्धशतक?

"नवीन येणारी पिढीसुद्धा आपण आपल्याला हवी तशी घडवू शकतो; मात्र त्यासाठी आपल्या पिढीने एकत्र राहायला हवे,'' असे मत आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. यावेळी "म्हाडा'चे सभापती संजय केणेकर, विनोद बंडावाला, राजेश भंडारी, वैशाली बागूल, तिलोत्तमा झाडे, वसंत वडीकर, प्रा. संजय गायकवाड, कल्याण मोरे, अनिता करडेल, अर्चना कर्जतकर, अपर्णा आचार्य, शारदा दाभाडे, ज्योती थोरात, पृथ्वीराज पवार, रमेश पवार उपस्थित होते. अजय तुपे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. मनीषा नाईक-जोशी यांनी प्रास्ताविक केले. 

हरवलेल्यांना एकत्र आणले : संजय केणेकर 

"अशाप्रकारे सर्वांची भेट होणे हा आश्‍चर्यचकित करणारा कार्यक्रम आहे. आपण जेवढी जास्त प्रगती करतो तेवढे कुटुंब, मित्रांपासून हरवतो. त्यामुळे हरवलेली माणसं अशा कार्यक्रमातून एकत्र आली, याचा आनंद वेगळाच आहे,'' असे "म्हाडा'चे सभापती संजय केणेकर म्हणाले. 

हेही वाचा - इथे सेक्सचा रेट तीन हजार होता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deogiri College Friends met After 27 Years in Aurangabad