बीडमधील कारनामा : देवस्थानची लाखोंची रक्कम अध्यक्षांच्या मुलांच्या खात्यावर 

दत्ता देशमुख
Sunday, 15 November 2020

पोलिस, धर्मादाय विभागाला तक्रारीनंतर रक्कम पुन्हा खात्यात 

बीड : शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या दक्षिणमुखी हनुमान टेकडी देवस्थानच्या खात्यात असलेली लाखो रुपयांची रक्कम ट्रस्टच्या अध्यक्षांच्या पुत्रांच्या खात्यावर वळती झाली. मात्र, तक्रारीनंतर पुन्हा ही रक्कम देवस्थानच्या खात्यावर जमा करण्यात आली. मात्र, सहा महिने संबंधितांनी ही रक्कम वापरली. विशेष म्हणजे देवस्थानचा फलकही गायब करून त्या ठिकाणी दुसराच फलक लावण्याचा प्रतापही ट्रस्टने केला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि धर्मादाय उपायुक्तांकडे विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील जुना मोंढा भागातील हनुमान टेकडी देवस्थानला असलेल्या काही मालमत्तांमधून उत्पन्न मिळते. त्याचा आर्थिक व्यवहार शहरातील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेतून केला जातो. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश जाजू हे द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. तर या बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा या ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, ता. २८ फेब्रुवारीला ट्रस्टच्या खात्यातून ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश जाजू यांचा मुलगा नंदकिशोर जाजू यांच्या खात्यावर तब्बल १५ लाख ३० हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. याच दिवशी त्यांचेच दुसरे पुत्र राधेश्याम जाजू यांच्या खात्यावर ट्रस्टच्या खात्यातून तब्बल ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, लक्ष्मण शेनकुडे व ॲड. नारायण सिरसट यांनी दिली. याबाबत या तिघांसह इतरांनीही पोलिस अधीक्षक, धर्मादाय उपायुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे तक्रारीनंतर तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीने याच रकमा ता. सात सप्टेंबरला पुन्हा ट्रस्टच्या खात्यावर जमा करण्यात आल्या. विशेष म्हणजे लाखो रुपयांचा व्यवहार आणि मालमत्ता असणाऱ्या या ट्रस्टचा फलकही तक्रारीनंतर लावण्यात आला आहे. यापूर्वी याच ठिकाणी संतोषीमाता मंदिर नावाचा फलक झळकत होता. यामागेही नेमके इंगित काय हे कळण्यापलिकडे आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिस म्हणतात, पैसे आले तडजोड झाली 
याबाबत भाविकांनी हा प्रकार अफरातफरीचा आणि हेराफेरीचा असल्याने गुन्हा नोंद करण्याची मागणी पेठ बीड पोलिस ठाण्यात व पोलिस अधीक्षकांकडे केली. त्याची दखल न घेतल्याने आपले सरकार या पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली. याचे उत्तर पोलिसांनी मजेशीर दिले आहे. विश्वस्त व गैरअर्जदार यांच्यात तडजोड झाली असून, रक्कम संस्थानच्या खात्यात परत केली आहे असे सांगितले. त्यामुळे एखाद्या संस्थानच्या खात्यातील रकमेची या खात्यावरून त्या खात्यावर वळता वळत करणे गैरप्रकार नसल्याचा साक्षात्कार पोलिसांना झाला. आता धर्मादाय उपायुक्त कार्यालयात याची सुनावणी सुरू आहे. 

 
बांधकामासाठी नियमानुसार सर्व सोपस्कर करून पैसे दिले होते. लॉकडाउनमुळे बांधकाम करता आले नाही. त्यामुळे पुन्हा पैसे परत खात्यावर घेण्यात आले. यात काहीही अनियमितता नाही. तक्रारदार काहीही तक्रारी करतात. 
- ओमप्रकाश जाजू, अध्यक्ष, दक्षिणमुखी हनुमान टेकडी संस्थान बीड. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devasthan money account in Presidents son beed news