बीडमधील त्या लग्नाचे विघ्न; आणखी पाच कोरोनाग्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

  • शहरातील एकासह पाटोद्यात चार रुग्ण 
  • जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११३ 
  • रविवारी तिघांसह ८१ जणांची कोरोनावर मात 

बीड - शहरात मागच्या सहा दिवसांपूर्वी (ता. १५) झालेल्या लग्नात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या आणखी पाचजणांना कोरोना असल्याचे रविवारी (ता. २१) समोर आले. पाटोदा शहरातील चौघांसह बीड शहरातील एकजण कोरोनाबाधित आढळला. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११३ वर पोचली आहे. तर दुसरीकडे रविवारी आणखी तिघांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्तांची संख्या ८१ झाली. 

मागच्या आठवड्यात शहरातील मसरतनगर येथील एका कुटुंबासह झमझम कॉलनी भागातील एक हैदराबादला जाऊन आले. या चौघांनाही कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले. मात्र, हैदराबादहून परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइनच्या दिलेल्या सूचना पाळल्या नाहीत. त्यांच्या संपर्कातून अनेकांना संसर्ग झाल्याचे समोर आले. या लोकांनी अगदी शहरातील एका विवाह सोहळ्यालाही हजेरी लावली होती. या सोहळ्यातील संपर्कातील काही लोकांना शनिवारीही कोरोनाचा संसर्ग आढळून आला. त्यापूर्वीही यांच्या संपर्कातील काही लोक कोरोनाग्रस्त आढळून आले.

हेही वाचा - कोरोनाशी हिमतीने लढणाऱ्या डॉक्टरांना प्रशासनानेच केले हतबल 

दरम्यान, रविवारी पाठविलेल्या ३१ थ्रोट स्वॅब नमुन्यांपैकी पाच नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर २३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तीन नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, पाटोदा शहरातील माळीगल्ली भागातील चार व्यक्तींसह बीड शहरातील शहेंशहानगर भागातील एकास कोरोनाची बाधा असल्याचे आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११३ झाली असून आतापर्यंत ८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यःस्थितीत २६ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून चौघांचा मृत्यू झाला. 

पाटोदा येथे दोन बालके 
आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये एक ११ वर्षाची मुलगी तर सात वर्षांचा मुलगा आहे. तर, ३० वर्षांच्या महिलेसह ३३ वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. बीड शहरातील रुग्ण हा २५ वर्षीय तरुण आहे. 

हेही वाचा - विनयभंगप्रकरणी बीडमधील आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी

शहेंशाहनगर कंटेनमेंट; संचारबंदी लागू 
बीड शहरातील शहेंशाहनगर येथे कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आल्याने संबंधित क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषित करून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. 

पाटोद्यात माळीगल्लीत कंटेनमेंट झोन 
पाटोदा शहरातील माळीगल्ली येथे कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आल्याने संबंधित क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषित करून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disruption of that marriage in Beed; Five more corona