corornavirus - आधुनिक वैद्यकीय साधनांसह डॉक्टर सज्ज 

दत्ता देशमुख
Wednesday, 1 April 2020

  • दोन हजार पीपीई किट दाखल, आणखी आठ हजार मिळणार 
  • तीन हजार एन- ९५ मास्क 
  • बीड, अंबाजोगाईसह केज व परळीलाही विलगीकरण कक्ष 
  • प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ७०० खाटांच्या क्षमतेचे अलगीकरण कक्ष 
  • ‘येडेश्वरी’, ‘सोळंके’ कारखान्यांवर सॅनिटायझरची निर्मिती 

बीड - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांत राज्यासाठी मागदर्शक पॅटर्न ठरलेल्या बीड जिल्ह्यात भविष्यात युद्धाची स्थिती उद्भवली तरी आधुनिक वैद्यकीय साधनांसह डॉक्टर, कर्मचाऱ्यांची फौज तयार आहे. मंगळवारी (ता. ३१) उशिरा दोन हजार कोरोनासाठीचे पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) किट जिल्ह्याला मिळाले असून आठवडाभरात ही संख्या दहा हजारांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरोग्यसेवेत तळमळीने काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स व संबंधित कर्मचाऱ्यांनाही वेळेनुसार सुरक्षा साधने उपलब्ध होणार आहेत.

 कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यावर उपचार कठीण आहे; परंतु गर्दी टाळली तर या विषाणूचा संसर्ग रोखता येणे शक्य आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेले जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन या दंडकाची जिल्ह्यात अंमलबजावणी उत्तम होत आहे. कडक अंमलबजावणीसाठी गुन्हे, बाहेरून आलेल्यांची स्क्रीनिंग, काही लक्षणे आढळलेल्यांची ॲपवर नोंदणी, स्थलांतरित मजुरांची गावाबाहेरील शाळांत राहण्याची सोय, शिथिलतेच्या वेळेत घट करून सकाळची वेळ, त्यातही केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच वाहनांचा वापर, चेकपोस्ट सील करणे, बाहेरून आलेल्यांच्या स्वतंत्र नोंदी व गजर असलेल्यांचे होम क्वारंटाइन अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांत बीड जिल्हा अव्वल ठरला.

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

आजपर्यंतच्या काळात जिल्ह्यात एकही कोरोना संशयित आढळला नाही. या कामात अधिकाऱ्यांचे नियोजन आणि प्रशासनाच्या सहकार्याबरोबरच सामान्यांचा प्रतिसादही कौतुकास्पद ठरला आहे; परंतु आता कोरोना संसर्गाचा तिसरा टप्पा असून भविष्यात काही वेळ आली तरी प्रशासनाने सर्वच तयारी जोरात केली आहे. 

भविष्यातील तयारीही पूर्णत्वाकडे 
कोरोनाचा अद्याप रुग्ण सापडला नसला तरी स्थलांतरितांची संख्या २० मार्चपासून हळूहळू वाढत आहे. अद्यापही लोंढे सुरूच आहेत. त्यातून आगामी काळात काही वेगळी वेळ आली तर त्यासाठीही प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. मंगळवारी उशिरा जिल्ह्यासाठी दोन हजार सुरक्षा किट (पीपीई - पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) जिल्ह्याला उपलब्ध झाले. या आठवडाभरात या उपलब्ध किटचा आकडा दहा हजारांपर्यंत जाणार आहे. प्रशासनाने सुरवातीला बीडच्या जिल्हा रुग्णालयात व अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी शंभर बेडचे विलगीकरण कक्ष उभारले होते.

हेही वाचा - मजुरांचे जत्थे पायीच निघाले गावाच्या प्रवासाला

आता या दोनशे खाटांसह केज व परळीच्या उपजिल्हा रुग्णालयांत आणखी प्रत्येकी ५० बेडची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ३०० खाटांचे अलगीकरण कक्ष आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यांना अलगीकरण कक्षांची उभारणी केली असून तेथील बेडची क्षमता ७०० आहे. जर आणखी गरज पडली तर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणखी विलगीकरण क्षमता वाढविण्यात येणार असून त्यादृष्टीने जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीची व्यवस्था डॉ. सत्यवान जाधव यांच्या शाहूनगर येथील यशवंतराव जाधव हॉस्पिटल व डॉ. रामेश्वर आवाड यांच्या राम हॉस्पिटल व डॉ. किरण शिंदे यांच्या बार्शी रोडवरील जिजाऊ हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहे.

दरम्यान, सोमवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावार यांनी केज, परळी या उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षासह अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षाची आणि लोखंडी येथील वृद्धत्व निवारण रुग्णालयातील अलगीकरण कक्षाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. चाटे, डॉ. आठवले, डॉ. वासंती चव्हाण होते. 

लढणाऱ्या सैनिकांनाही सुरक्षा कवच 
कोरोना विषाणूचा जिल्ह्यात अद्याप रुग्ण नाही; परंतु संचारबंदी सुरू आहे. या काळात अनेक खासगी डॉक्टरांनी आपली शस्त्रे म्यान केली आहेत. त्यांनी पीपीई किटसह (वैयक्तिक सुरक्षा कवच) सॅनिटायझर, एन-९५ मास्क नसल्याचे कारण पुढे केले आहे; परंतु याही परिस्थितीत शासकीय सेवेतील अनेक डॉक्टर, स्टाफ नर्ससह इतर कर्मचारी काम करीत आहेत. या काळातही उपजिल्हा रुग्णालयांत सेवेत असलेल्या काही डॉक्टरांनी आहे त्या साधनांसह जीव ओतून काम करीत दिवसाला पुणे-मुंबईहून आलेले २०० लोक दिवसाला तपासले आहेत.

हेही वाचा - परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

आता अशा लढणाऱ्या सैनिकांनाही लवकरच आधुनिक सुरक्षेची साधने उपलब्ध होणार आहेत. आताच दोन हजार पीपीई किट उपलब्ध झाले असून लवकर हा आकडा दहा हजारांच्या घरात जाईल. सध्या एन-९५ हे तीन हजार मास्कदेखील उपलब्ध आहेत. सॅनिटायझरही लवकरच उपलब्ध होणार आहे. 

येडेश्वरी-माजलगाव कारखाना करणार सॅनिटाझरचे उत्पादन 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आवश्यक असलेल्या सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. खासगी डॉक्टरांसह वैयक्तिक घरी वापरासाठी आणि शासकीय रुग्णालयांतही याची उपलब्धता सध्या अपुरीच आहे. मात्र, आता जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी सॅनिटायझर उत्पादनाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी (ता. केज) कारखान्याला याची परवानगीही मिळाली असून तेलगाव (ता. धारूर) येथील सुंदररराव सोळंके कारखान्याचा प्रस्ताव तयार होत आहे. 

हेही वाचा - यंदा हाताला मेहंदी नव्हे, सॅनिटायझर लावण्याची वेळ

एकही कोरोना नाही; आणखी दोन स्वॅबचे अहवालही निगेटिव्ह 
बीड : जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. ३१) एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. सोमवारी (ता. ३०) अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात दाखल करून स्वॅब पाठविलेल्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १६ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात जिल्हा रुग्णालयातून १२, तर स्वारतीमूधन चार असे १६ स्वॅब पाठविले होते. सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor equipped with modern medical equipment