लातूर येथे भरधाव कारच्या धडकेत डॉक्टर ठार, दाम्पत्य गंभीर

 Doctor killed in accident at Latur
Doctor killed in accident at Latur

लातूर - सकाळच्या वेळी रस्ता मोकळा असल्याने एका तरुणाने घरातून कार काढून रस्त्यावर आणली. ती भरधाव चालवून दिलेल्या धडकेत एक डॉक्टर ठार झाला तर दोघे जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजता नंदी स्टॉप परिसरात घडली. पोलिसांनी या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सकाळी सहाच्या वेळी रस्त्यावर गर्दी नसते. त्यामुळे येथील आदित्य संजय शिंदे (वय १९) या तरुणाने घरातून कार (एमएच- २४, एबी- ००१७) काढली. शिवाजी चौकातून तो राजीव गांधी चौकाकडे भरधाव वेगाने कार चालवू लागला. कारवरचे त्याचे नियंत्रण सुटले. त्याने पहिल्यांदा दुचाकीला (एमएच- २४, बीएफ- २४२४) धडक दिली. त्याने या दुचाकीला फरपटत नेत पुढे रस्त्याच्या कडेने वॉकिंग करणाऱ्या डॉ. तात्याराव मोहिते (वय ७५) यांना जोराची धडक दिली. त्यानंतर ही कार एका दुकानात घुसली.

या अपघातात डॉ. मोहिते हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच ९.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील संजय संदेश ढगे व अंजली बालाजी हारडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

हे दोघे लातूर वृक्ष चळवळीचे कार्यकर्ते आहेत. शहरात झाडे लावण्यासाठी ते जात होते. या अपघातात कारने धडक दिल्याने एका दुकानाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी कारचा चालक आदित्य संजय शिंदे (वय १९) याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com