उच्चभ्रूच्या उद्यानात कुत्र्यांकडून होते स्वागत 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद - शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहत म्हणून नावाजलेल्या सिडको एन-एक परिसरातील उद्यानाची अवस्था बकाल अशी झाली आहे. त्यामुळे याठिकाणी फिरण्यासाठी देखील फार कुणी जात नसल्याचे सांगितले जात असून, लहान मुलांच्या खेळणीच्या ठिकाणी फुपाटा उडतो आहे. विशेष म्हणजे या उद्यानात प्रवेश करायचा म्हटले तर कुत्रेच स्वागताला उभे असतात. त्यामुळे लोकांना भिती वाटत आहे. 

सिडको चौकापासून जळगाव रोडने जात असताना उजव्या हाताला थोडे अंतरावर गेल्यानंतर सिडको एन-एक येथील गार्डन लागते. आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर कळते, याठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी, उद्योगपती अशी मंडळी राहते. त्यांची घरेदारेही पाहताच आपण औरंगाबादेच आहोत का, असा प्रश्‍न पडतो. अशा प्रकारचे बंगले याठिकाणी आहेत. मात्र, उद्यान पाहिले तर एकदम बकाल दिसून येते.

याठिकाणी मोकाट कुत्र्यांचा मुक्‍तसंचार, त्यामुळेही मुले तिकडे फिरकत नाहीत. आतमध्ये स्वच्छता नाही. शोसाठी लावण्यात आलेले झाडे आता पाण्याअभावी माना टाकत आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले साहित्यदेखील थोडेच आहे. शनिवारी (ता.21) या उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या आत जाण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्यांची एक जोडी समोर उभी होती. आत डोकावून पाहिले तर मध्येही काही कुत्रे होती. विशेष म्हणजे आत डोकावले तरी ते भुंकतात म्हणजे येथे येणाऱ्यांना हा देखील त्रास सहन करावा लागत असेल. 

या उद्यानाच्या भिंतीलगतच कचरा, शिळे अन्न टाकले जाते आहे. त्यामुळे या कचऱ्यावर कुत्रे रेंगाळतात आणि नंतर सुरक्षित म्हणून उद्यानात जाऊन बसतात, असे बघायला मिळाले. त्यामुळे हे उद्यान व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेले काय करतात, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

बिबट्या पकडला, तरीही भीती 
दोन आठवड्यांपूर्वी सिडको परिसरातील दुसऱ्या एका गार्डनमध्ये बिबट्या पकडण्यात आला. यासाठी मोठा फौजफाटा दाखल झालेला होता. अनेकानी बिबट्याला कुत्राच समजले. मात्र, नंतर कळल्यानंतर भंबेरी उडाली. बिबट्या पकडून गौताळा अभयारण्यात सोडण्यात आलेला आहे. मात्र, याठिकाणी फिरणारे लोक अजूनही बिबट्याचे नाव निघताच घाबरतात. सर्वच उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक असावेत, अशी मागणीही आता समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com