Coronavirus : ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराचे दरवाजे पहिल्यांदाच बंद

प्रा. प्रवीण फुटके 
Wednesday, 18 March 2020

परळी वैजनाथ शहरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले आहेत.

परळी वैजनाथ (जि. बीड) -  देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले आहेत. भाविक येऊ नयेत म्हणून मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. 

जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशात व राज्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालयानंतर आता धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता राज्यातील सर्व महत्वाची मंदिरे मंगळवारपासून देवदर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत देवदर्शनासाठी बंद करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले होते.यामुळे वैद्यनाथ मंदिराचे सर्व दरवाजे मंदिराच्या इतिहासात प्रथमच बंद करण्यात आले आहेत. मात्र पुजारी रोज होणारी नियमित पुजाअर्चा करणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी सांगितले. तसेच सर्व शहर, परिसरातील व पर्यटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री.देशमुख यांनी यावेळी केले. 

परळी येथील अन्नछत्र बंद 
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात शनी मंदिरासमोरील श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अन्नछत्र पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती या ट्रस्टच्या संचालकांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून या ट्रस्टच्या वतीने अन्नछत्रच्या माध्यमातून बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मोफत जेवणाची सेवा दिली जात आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

शेकडो भाविकांना याचा लाभ होत आहे; मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता अन्नछत्र सोमवारपासून पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या संचालकांकडून घेण्यात आला आहे. या वेळेत फक्त भिक्षुकांसाठी पॅकेटद्वारे जेवण देण्यात येणार आहे. भाविकांना होत असलेल्या या गैरसोयीबद्दल श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत सहकार्याची भावना ठेवावी, असे आवाहन केले गेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doors of Vaidyanath Temple closed for the first time