डॉक्‍टरांच्या निवासस्थानांना ड्रेनेजच्या पाण्याचा वेढा, रुग्णसेवा करणाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ

य़ोगेश पायघन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवा केंद्राशेजारीच "डी' विंगला दुर्गंधीयुक्त ड्रेनेजच्या पाण्याने वेढले आहे. हे पाणी भिंतीत झिरपत असल्याने इमारतीतील रहिवाशांना राहणे अवघड बनले आहे.

औरंगाबाद : घाटी परिसरात घाणीचे साम्राज्य नवे नाही. सर्जिकल व मेडिसीन विभागाच्या बाह्य परिसरात स्वच्छतेची बोंब असताना लहान-मोठ्या दुरुस्त्यांनाही ब्रेक लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवा केंद्राशेजारच्या डॉक्‍टर, परिचारिका व कर्मचारी निवास्थानांना ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याने वेढले आहे. त्यात डुकरे, कुत्र्यांचा वावर वाढल्याने दुर्गंधीने त्रस्त रहिवाशांनी दुरुस्तीची मागणी गुरुवारी (ता. पाच) अधिष्ठातांकडे केली आहे.

वार्षिक दुरुस्तीचे कंत्राट न दिले गेल्याने मार्च महिन्यापासून घाटीत छोट्या-मोठ्या दुरुस्त्या रखडल्या आहेत. त्यात कर्मचारी निवासस्थानांची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने राहणेही अवघड बनले आहे. सुपरस्पेशालिटीच्या समोरच्या निवासस्थानात सहाजणांत एकच स्वच्छतागृह सुरू आहे.

हेही वाचा ः उपाययोजना बंद, अपघात सुरू 

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांतील दुरुस्त्यांअभावी निम्मेअधिक स्वच्छतागृह बंद आहेत. या दुरुस्तीसाठी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवा केंद्राशेजारीच "डी' विंगला दुर्गंधीयुक्त ड्रेनेजच्या पाण्याने वेढले आहे. हे पाणी भिंतीत झिरपत असल्याने इमारतीतील रहिवाशांना राहणे अवघड बनले आहे. येथील रहिवासी सहायक अधिसेविका संजीवनी गायकवाड यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी भेट घेऊन निवेदन देऊन व्यथा मांडली. त्यावर उपअधीक्षकांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना डॉ. सुक्रे यांना दिल्या. दरम्यान, कुत्र्यांना पकडण्यासाठी डॉग स्कॉडचे कर्मचारीही सायंकाळी घाटीच्या मेडिसीन विभाग परिसरात दाखल झाले होते. 

या आहेत असुविधा 

  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवा केंद्राशेजारची परिस्थिती 
  • परिचारिका, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय दुर्गंधीने त्रस्त 
  • गवत, काटेरी झुडपांमुळे कुत्रे, डुकरांचा वावर वाढला 
  • रहिवासी डेंगी, व्हायरलच्या तापाने फणफणले 

निवासस्थाने मोफत नाहीत

परिचारिका, कर्मचाऱ्यांसह डॉक्‍टरांसाठी असलेली निवासस्थाने ही मोफत मिळत नाहीत. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून रहिवासी भत्ता कापला जातो. पाच ते दहा हजार रुपये देऊन त्याबदल्यात आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगल्या नागरी सुविधा का मिळू नयेत, असा सवाल येथील कर्मचाऱ्यांनी केला. 

हेही वाचा : प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा.... 

आजारपण लागले

या निवासस्थानांत राहणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे आजारपणाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यात याच इमारतीतील ज्येष्ठ डॉक्‍टरांच्या मुलाला डेंगी झाल्याने भरती करावे लागले होते, असेही कर्मचारी म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drainage Water In Ghati Doctors' Residences