वाहनांवर दगडफेक करीत चालकांना लुटले, औसा-तुळजापूर महामार्गावरील घटना

गौस शेख
Thursday, 5 November 2020

औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आशिव टोलनाक्या जवळील रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी तीन वाहनांवर दगडफेक करीत वाहनचालकांना लुटल्याची घटना गुरुवारी (ता.पाच) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.

बेलकुंड (जि.लातूर) : औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आशिव टोलनाक्या जवळील रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी तीन वाहनांवर दगडफेक करीत वाहनचालकांना लुटल्याची घटना गुरुवारी (ता.पाच) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आशिव व उजनी (ता.उजनी) गावात चोरीची घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून चेन्नई येथून छत्तीसगडला जाणाऱ्या तीन वाहनांवर दगडफेक करून अंदाजे ३६ हजार रुपये लुटण्याची घटना घडली आहे.

सत्तेचा मोह असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प, विनायक मेटेंचा घणाघात

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती, पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक व पंधरा पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासासाठी परिसरातील भागात चोरट्यांचा मागोवा घेतला. तसेच या घटनेची माहिती परिसरातील गावातील काही ग्रामस्थांना देत सतर्क राहून संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती भादा पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले होते. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. उजनी व आशिव येथील घरफोडीची घटना ताजी असतानाच घटलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. वाहनांच्या लुटमारीबाबत उशिरापर्यंत भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drivers Looted While Stone Pelting Latur News