Coronavirus : जालन्यात आठ जण हायरिस्कमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

आले होते तीन कोरोना बाधितांच्या संपर्कात 

जालना  : जिल्ह्यात रविवारी (ता.१०) आढळून आलेल्या तीन कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात एकूण आठ व्यक्ती हायरिस्कमध्ये असल्याचे समोर आले आहे. या आठही
जणांच्या घश्याच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

मुंबईहून कानडगाव (ता. अंबड) येथे आलेल्या तीन व्यक्तींपैकी दोन तर इंडेवाडी येथील रंगनाथनगर भागातील गर्भवतीचा अहवाल रविवारी पॉझिटीव्ह झाला. त्यांच्याशी निकटचा संपर्क आलेल्या आठ व्यक्तींना रुग्णालयात भरती करण्यात आले. ते सर्वजण हायरिस्कमध्ये असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ११) पॉझिटीव्ह आढळून आलेली परिचारिका आणि राज्य राखीव दलातील जवानांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आरोग्य विभाग शोध घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

अस्वस्थ वर्तमान 
  
इंडेवाडीतील १२५ कुटुंबाचे सर्वेक्षण 
रविवारी इंडेवाडीत येथील रंगनाथनगर भागातील एक गर्भवती कोरोना बाधित आढळून आली. सोमवारी (ता.११) आरोग्य विभागाच्या पथकाने रंगनाथनगर परिसरातील १२४ कुटुंबातील ६९९ नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले. या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील तीन हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. 
 
२८३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण २८३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात १५, मोतीबाग येथील शासकीय वसतिगृहात २८, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ९०, परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये २७, जाफराबाद येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये १५ तर हिंदुस्थान मंगल कार्यालयात ६, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २३ तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीत ६४, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ६, घनसावंगी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ९ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली
 
जालन्याची ‘रेड झोन’कडे वाटचाल 
जालन्यात पुन्हा दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेचा समावेश आहे. दुसरा रुग्ण हा राज्य राखीव दलातील जवान असून, तो मालेगाव बंदोबस्‍तावरून जालन्यात परतला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सोमवारी (ता.११) दिली. 

रविवारी (ता. १०) तीन रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात सोमवारी पुन्हा दोन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या एकूण १३ झाली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेचा समावेश असून, ती जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वॉर्डात कार्यरत आहे. राज्य राखीव दलाचा जवान मालेगाव बंदोबस्तावरून शहरात परतला होता. सदर जवानाचे शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात अलगीकरण करण्यात आले होते. सोमवारी या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेला कोविड-१९ची लागण झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांमध्ये धडकी भरली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight people In High Risk At Jalna