corona : उमरग्यात आठ गुरूजींचे अहवाल पॉझिटिव्ह!

अविनाश काळे
Friday, 20 November 2020


उमरगा : अॅन्टीजेन चाचणीत दिलासा ; स्वॅबच्या चाचणीत मात्र धक्का ! 

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे गेल्या सात महिन्यापासुन बंद असलेले शाळांचे प्रवेशद्वार सोमवारपासून (ता.२३) उघडण्यात येणार असल्याने तत्पूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने केलेल्या नियोजनानुसार गुरुवारी (ता. १९) व शुक्रवारी (ता. २०) पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व मुरूम, उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या अॅन्टीजेन चाचणीत एक शिक्षक पॉझिटिव्ह वगळता सर्वाधिक  शिक्षकांचा अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र बुधवारी (ता.१८) घेतलेल्या स्वॅबचा अहवाल गुरूवारी रात्री उशीरा प्राप्त झाल्यानंतर त्यात उमरगा शहरातील दोन शाळांतील सात शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरला नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने शाळेतील सर्वच शिक्षक व कर्मचारी यांची कोरोणा चाचणी होणे बंधनकारक असल्याने गटशिक्षण विभागाने केलेल्या नियोजनानुसार येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २९ गावातील शिक्षकांची रॅपिड अन्टीजेन चाचणी घेण्यात आली.  डॉ. साईनाथ जळकोटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुधिर जाधव, औषध निर्माता विजय धामशेट्टी, आरोग्य सेवक सुर्यकांत घंटे, अमोल जोशी, सिद्राम कस्तुरे, सुजित जगताप, हरि चव्हाण, राजेंद्र गायकवाड यांनी केलेल्या नियोजनाला महाराष्ट्र राज्य प्राथामिक शिक्षक समितीचे राज्य संघटक प्रदीप मदने यांनी सहकार्य केले. नाईचाकूर, आलूर, मुळज, येणेगुर, गुंजोटी प्राथमिक आरोग्य केंद्र व उमरगा उपजिल्हा रुग्णालय व मुरूम ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी शिक्षकांची तपासणी करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्वॅबच्या अहवालात सात पॉझिटिव्ह
उमरगा तालुक्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संख्या ६२३ आहे. बुधवारी (ता.१८) उमरग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या शहरातील एका शाळेच्या २५ शिक्षकांच्या स्वॅबमध्ये पाच शिक्षकांचा अहवाल गुरूवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला तर शहरातील दुसऱ्या एका शाळेचे दोन शिक्षक पॉझिटिव्ह आले. दरम्यान अॅन्टीजेनच्या चाचणी गुरुवारी घेण्यात आल्या त्यात उपजिल्हा रुग्णालयातील घेण्यात आलेल्या सर्वच ९१, मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सर्वच ५१ शिक्षकांचे तर पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या झालेल्या चाचण्यात शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी (ता. २०) उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या ११७ शिक्षकांच्या चाचणीत शहरातील एका शाळेच्या शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयातील सर्व ६२ शिक्षकाच्या चाचण्याचा अहवाल निगेटिव्ह आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. स्वॅबच्या चाचणीत सात शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले त्यात एक शिक्षक दहावीच्या पुरवणी परिक्षेचे केंद्रसंचालक होते. शुक्रवारी सकाळी तातडीने केंद्र संचालक बदलला. गुरुवारी व शुक्रवारच्या अन्टीजेन चाचणीत सर्वाधिक शिक्षक निगेटिव्ह आढळून आले मात्र एक शिक्षक बाधित आढळून आला. उर्वरीत  शिक्षकांनी ज्या त्या संबंधित आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी असे आवाहन गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी केले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight teachers report corona positive Umarga news