coronavirus - बीड जिल्ह्यात ११ हजार तरुण करणार गावांची सुरक्षा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

जिल्हाभरातील गावांतील २३९० चेकपोस्टवर हे ग्रामसुरक्षारक्षक पहारा देणार आहेत. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांना रोखण्याबरोबरच वृद्ध, गर्भवती यांची काळजी घेण्याची जबाबदारीही या पथकावर आहे.

बीड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांत आता ग्रामसुरक्षा पथकांची भर पडली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात २४४१ पथके स्थापन झाली असून ११ हजार तरुण व नागरिकांचा समावेश असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी दिली.

जिल्हाभरातील गावांतील २३९० चेकपोस्टवर हे ग्रामसुरक्षारक्षक पहारा देणार आहेत. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांना रोखण्याबरोबरच वृद्ध, गर्भवती यांची काळजी घेण्याची जबाबदारीही या पथकावर आहे. स्थलांतरितांचा जिल्हा असलेल्या जिल्ह्यात पुणे-मुंबईसह इतर कोरोनासंसर्ग असलेल्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. आता ऊसतोड मजुरांचेही आगमन होत आहे. या काळात संचारबंदीची अंमलबजावणी पोलिस जरी करीत असले, तरी मनुष्यबळाचा विचार करता गावपातळीवरही लक्ष ठेवणारी यंत्रणा गरजेची होती. त्यासाठी ग्रामसुरक्षा दलांची स्थापना करण्याची संकल्पना सीईओ अजित कुंभार यांनी मांडली. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

जिल्ह्यात २४४१ पथकांची स्थापना झाली असून यामध्ये तब्बल ११ तरुण व नागरिकांचा समावेश आहे. परजिल्ह्यातून कोणीही नागरिक जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, याची काळजी घेण्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशदेखील हे पथक समजावून सांगणार आहे. तरीही कोणी प्रवेशासाठी हट्ट करणाऱ्यांची माहिती पोलिस ठाण्याला कळविण्याची जबाबदारीही ही पथके सांभाळणार आहेत. त्यातही कोणी नियमबाह्य गावात आलेच तर त्यांची व्यवस्था गावातील शाळेत किंवा गावच्या सभागृहात केली जाणार आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

कामानिमित्त पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर व इतर ठिकाणी आहेत त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना या पथकानेच करायची आहे. 
यासह गावातील वृद्ध, गर्भवती स्त्रिया, बालके, विविध आजारांनी पीडित लोकांची काळजी घेण्याची जबाबदारीही या पथकावर आहे. आवश्यक गरजांचा पुरवठा घरीच होईल, याची खबरदारीही हे पथक घेणार आहे. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

१६४ स्वॅब तपासले; १६१ निगेटिव्ह 
जिल्ह्यात आतापर्यंत १६४ स्वॅबची तपासणी करण्यात आली असून यापैकी प्राप्त झालेले सर्व १६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. यात १३ जणांच्या स्वॅबची दुबार तपासणी करण्यात आली. १६४ स्वॅबमध्ये जिल्हा रुग्णालयातून १२२, तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून ४२ स्वॅब तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, बाहेरजिल्ह्यांतून आलेले २८ जण होम क्वारंटाइन असून, संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्यांची संख्या ११० आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven thousands youths to protect villages in Beed district