धक्कादायक! दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या, बीड जिल्ह्यातील विदारक चित्र

दत्ता देशमुख
Monday, 7 December 2020

नापिकी, कर्जबाजारीपणातून शेतकरी करतात मृत्यू जवळ 

बीड : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना अनेक वेळा शासनाच्या दफ्तर दिरंगाईचाही फटका सहन करावा लागतो. यामुळेच शेतकरी जगण्यापेक्षा मरण जवळ करतोय. जिल्ह्यात दर सव्वादोन दिवसाला एका शेतकऱ्याने मरणाला कवटाळल्याचे आकडेवारीवरून दिसते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या ११ महिन्यांत तब्बल १६० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद शासन दरबारी झाली आहे. यातील ६७ प्रकरणे प्रशासनाने निकाली काढली असून, ५० आत्महत्या मदतपात्र नसल्याचा शेरा मारला गेला आहे. 

मराठवाड्यातील सर्व बातम्या बातम्या वाचण्यासाठी येथे करा क्लिक

जिल्ह्यात माजलगाव, मांजरा असे मोठे सिंचन प्रकल्प बोटावर मोजण्याऐवढेच. गोदावरी, सिंदफणा नद्यांसह पैठणचा उजवा कालवा जिल्ह्यातील काही भागांतून गेलेला असला तरी वीज पुरवठा असेल याचीही खात्री नाही. त्यामुळे फळबागा, बागायती, भाजीपाला असे छेत्रही अत्यल्प आहे. नऊ लाखांवर शेतकरी संख्या असलेल्या जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी मोसमी शेतीवरच अवलंबून असतात. दरम्यान, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ अनेक वेळा तर ओला दुष्काळही अधून-मधून पिच्छा पुरवीत असतो. सरत्या खरीप हंगामात तर सुरवातीला चांगला पाऊस झाला. पण, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने उगवणच झाली नाही. नंतर सलग तीन वेळा परतीच्या अतिवृष्टीने झोडपले आणि थोडेबहुत हाती आलेले पीकही वाया गेले. एकीकडे निसर्गाचे दुष्टचक्र असतानाच पुन्हा पंचनाम्यात दिरंगाई, मदत मिळण्यास उशीर अशीही आडकाठी शेतकऱ्यांसमोर असते. पिकलेले वेळेत विकण्यासाठी हमीभाव केंद्र लवकर सुरू होत नाहीत. 

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

दरम्यान, या सगळ्या दुष्टचक्रामुळे आर्थिक विवंचनेतील शेतकरी मरणाकडे वळत असल्याचे चित्र आहे. मागच्या पाच वर्षांत मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या. यंदाच्या सरत्या वर्षात तर दर सव्वादोन दिवसांनी एका शेतकऱ्याने मरण जवळ केले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत तब्बल १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दफ्तरी झाली आहे. म्हणजे एक दिवस आड जाताच एक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीतून दिसते. 

बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

५० शेतकरी कुटुंब मदतीस अपात्र 
१६० शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणात ६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ४३ प्रकरणे जिल्हास्तरीय समितीसमोर चौकशीसाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, यातील ५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीच्या निकषात बसत नसल्याने त्या अपात्र ठरल्या आहेत. 

(संपादन-गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: every two and half days farmer commits suicide Beed district news