मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली मुंबईत अन्‌ डाेके फाेडाफाेडी झाली गावात...

प्रशांत बर्दापूरकर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • बीड जिल्ह्यातील सायगावची घटना 
  • रविवारी रात्री नऊ जणांना घेतले ताब्यात 
  • परस्परविरोधी गुन्हे दाखल 
  • तीन जखमींवर अंबाजाेगाईत उपचार

अंबाजोगाई (जि. बीड) - सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात दिग्गज नेते चिंतेत बीड जिल्ह्यात दोन गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणात गंभीर जखमी झाल्याने तीन जण रुग्णालयात, तर नऊ जण पोलिस ठाण्यात मुक्कामी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने फटाके वाजवले म्हणून ही घटना घडली, हे विशेष! 

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यातील या घटनेप्रकरणी पोलिसांनी रविवारी (ता. 24) रात्री नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी (ता. 23) घडली होती. अंबाजोगाई तालुक्‍यातील सायगावात येथे शनिवारी फटाके वाजवल्याच्या कारणावरून दोन गटांत धारदार शस्त्राने मारहाण झाली. यात तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बर्दापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणी बर्दापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त, अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स बंद

पोलिसांनी सांगितले, की शनिवारी सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्याच्या समाधानाने गावातील रफिक खुरेशी यांनी आपल्या कार्यालयासमोर फटाके वाजवले. याचा राग धरून फय्याज उर्फ असीम महाफेजअली याच्यासह इतर 17 जणांनी खुरेशी याच्या घरी जाऊन त्याच्या मुलासह इतरांना काठ्या, चाकू यासह धारदार शस्त्राने मारहाण केली. त्यात त्याचा मुलगा मुजफ्फर खुरेशी याच्यासह इतर तीन जण जखमी झाले, अशी तक्रार रफीक अब्दुल रहिम खुरेशी यांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात दिली.

हेही वाचा - अजित पवार-फडणवीस 10 दिवसांपासून होते संपर्कात

तर, मुल्तजिफ महेफुजअली उस्मानी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आमच्या हॉटेलसमोर फटाके का वाजवता, असे विचारल्याच्या कारणावरून मुजफ्फर खुरेशी व रफिक खुरेशी यांच्यासह इतर सहा जणांनी चाकू व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

हेही वाचा - फडणवीस सरकारविषयी अंतिम निर्णय उद्या, शपथविधीवेळीची पत्रे उघड

या परस्परविरोधी तक्रारीवरून बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून रविवारी (ता. 24) रात्री नऊ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी दिली. घटनेतील जखमीवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis takes oath as CM, Beating two Groups in Beed