कौटुंबिक हिंसाचाराचा वाढतोय आलेख

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर : बाहेरच नव्हे, तर चार भिंतींच्या आतही महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या अकरा महिन्यांत कौटुंबिक हिंसाचाराच्या तब्बल 522 तक्रारी पोलिस दलाच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे दाखल झाल्या आहेत. तक्रारींचा हा आलेख दररोज वाढत चालला आहे. त्यामुळे लातूरमधीलही महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेचा आणि काळजीचा विषय बनला आहे. 
हैदराबाद येथे झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेवर देशभरात चर्चा सुरू आहे. सामाजिक सुरक्षिततेबरोबरच कौटुंबिक सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याचेही मुद्दे मांडले जात आहेत. यानिमित्ताने लातुरातील कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांचा आढावा घेतला असता अशा प्रकरणांत मागील काही वर्षांच्या तुलनेने यंदा वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. हे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. 

हुंड्यांसाठी छळ
महिला तक्रार निवारण केंद्राची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक दीपाली गित्ते यांच्याकडे आहे. त्यांच्याशी "सकाळ'ने या विषयावर संवाद साधला. त्या म्हणाल्या, की काही महिलांना कुटुंबाकडून हुंड्यांसाठी छळले जाते. तर काहीजण लग्नानंतर आवडत नाही म्हणून महिलांना त्रास देतात. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार वाढत चालले आहेत.

सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहायचे आहे

महिला पुढे येऊन तक्रारी देत आहेत. काही महिला नवऱ्यासोबत; पण सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहायचे आहे म्हणूनही तक्रारी देत आहेत. यात उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण जास्त आहे. एकूण तक्रारींमध्ये लग्नाला दीड-दोन वर्षे पूर्ण झालेल्या महिलांच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. दररोज किमान 2 ते 3 तक्रारी आमच्याकडे येत आहेत. आलेल्या एकूण तक्रारींमधून 199 प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर 128 प्रकरणांत तडजोड करून सोडविण्यात आले. 
व्हाट्सअॅप ग्रुपचा कंटाळा आलाय.. फॉलो करा या टिप्स
दामिनी पथकाने वाढवली गस्त 
हैदराबाद येथे झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्या दामिनी पथकाने शहरात गस्त वाढवली आहे. सिग्नल कॅम्प या भागात मोठ्या प्रमाणात खासगी शिकवण्या चालतात. त्यामुळे या भागात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे येण्या-जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय, गांधी चौक, बसस्थानक, गंजगोलाई, दयानंद गेट या भागातही मुलींची वर्दळ असते. त्यामुळे या भागात दामिनी पथकाने गेल्या काही दिवसांपासून अधिक गस्त घालण्यास सुरवात केली आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सिग्नल कॅम्प भागात रात्री उशिरापर्यंत पोलिसांची वाहने फिरत आहेत, अशी माहिती दीपाली गित्ते यांनी दिली. शहरात मुलींच्या छेडछाडीच्या घटना क्वचितच घडतात. याचे प्रमाण महिन्यातून दोन घटना असे आहे; पण घटना घडल्यानंतर सहसा मुलींचे पालक लेखी किंवा तोंडी तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. पालकांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

अशी आहे आकडेवारी 

 वर्ष  दाखल गुन्हे
2016 455 
2017 544 
2018  485 
2019 522 (नोव्हेंबरपर्यंत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com