जालना जिल्ह्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण 

टेंभुर्णी : मका पिकात कोळपणी करताना शेतकरी.
टेंभुर्णी : मका पिकात कोळपणी करताना शेतकरी.

जालना/टेंभुर्णी - जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मृगात शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरत पेरण्या उरकून घेतल्या. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल ७४.७६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक सोयाबीन, कापूस आणि मका पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.

दरम्यान, सोयाबीनची उगवण न झाल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त होत असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असते; मात्र गतवर्षीचा कापूस अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कपाशीकडे शेतकरी पाठ फिरवतील असा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ४१ हजार ९०५.१५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ८३.३७ टक्के कपाशीची लागवड झाली आहे. त्या पाठोपाठ जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरणी झाली आहे.

आतापर्यंत जालना जिल्ह्यात एक लाख एक हजार ७८७.१४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे. मात्र, काही ठिकाणी सोयाबीनची उगवण न झाल्याच्या ३७ तक्रारी मंगळवारअखरेपर्यंत शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात ६५.६१ टक्के म्हणजे ३२ हजार ९९९.३४ हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला आहे. तसेच ३४ हजार ४५३.९४ हेक्टर क्षेत्रावर मकाची ६१.९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर २३ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाल्याचा अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. 

शेतशिवारात खरिपाच्या कामांची धांदल 

टेंभुर्णी परिसरातील शेतशिवारात कपाशी लागवड, मक्याची कोळपणी अशा विविध खरिपाच्या कामांची धांदल सुरू आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या मंगळवारी (ता.२३) सायंकाळच्या भुरभुर पावसाने आशा पल्लवित केल्या. दरम्यान, बुधवारी (ता.२४) आंबेगाव शिवारात शेतात ओलावा आल्याने शेतकऱ्यांची कपाशीची तूट लावण्याची लगबग सुरू होती. टेंभुर्णी परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कपाशीत तुटी पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी तूट भरून काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. कपाशीच्या पिकातील तणकाढणीच्या कामासाठी मजूर उपलब्ध असल्याने निंदणीची कामेही वेगाने होत आहेत. शेतीची कामे सुरू असल्याने शेतशिवार माणसांनी गजबजून गेले आहे.  अनेक ठिकाणी मक्याचे पीक बहरात असल्याने कोळपणीचे कामही होत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब शेतात कामे करण्यात व्यस्त आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com