इवल्याशा कपाशीला गिलासाने पाणी 

संजय राऊत
Wednesday, 24 June 2020

निसर्गाच्या भरवशावर खरीप हंगामातील पेरणी, लागवड केली आणि मृगनक्षत्रानंतर पावसाने उघडीप दिली. यामुळे नुकतीच भुईतून डोके वर काढणारी पिके कोमेजू लागली. ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्लासने पाणी टाकण्यास सुरवात केली आहे. 

टेंभुर्णी (जि.जालना) - खरिपाची लागवड झाली तरी पीककर्ज मिळाले नसल्याने ठिबकविना अनेक शेतकऱ्यांनी शेतात कपाशीचे पीक लावले. निसर्गाच्या भरवशावर लागवड केली आणि मृगनक्षत्रानंतर पावसाने उघडीप दिली. यामुळे नुकतीच भुईतून डोके वर काढणारी पिके कोमेजू लागली. ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्लासने पाणी टाकण्यास सुरवात केली आहे. 

लॉकडाउनमुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांना ठिबक घेता आले नाही. पैशांची अडचण असून बँकांकडून पीककर्ज मिळत नसल्याने आहे त्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी लागवड केली.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने पेरणी केलेले बियाणे वाया जाऊ नये म्हणून येथील शेतकरी ठकसेन उखर्डे, रामू उखर्डे यांनी शेतात कपाशी आणि मिरचीला मंगळवारी ग्लासद्वारे पाणी दिले. 

हेही वाचा : कसे रुजावे बियाणे...

ज्या भागात शेतकऱ्यांना मुबलक पाणी आहे व विजेची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन करून कपाशीचे पीक जगविण्याची सुरवात केली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. काळ्या आईच्या कुशीत टाकलेले बियाणे जगविण्यासाठी शेतकरी कुटुंबाची धडपड होत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत दीडशे मिलिमीटर पाऊस 

जालना जिल्ह्यात मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी ०.२७ मिलिमीटर एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५२.५६ मिलिमीटर सरासरी पाऊस पडलेला आहे. यात जालना तालुक्यात १३५.८५, बदनापूर तालुक्यात १६९.४०, भोकरदन तालुक्यात १६२.०४, जाफराबाद तालुक्यात १५७, परतूर तालुक्यात १२०.६०, मंठा तालुक्यात १४५.७५, अंबड तालुक्यात १८३.४२, घनसावंगी तालुक्यात १४६.४४ मिलिमीटर अशा एकूण पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer waiting for rain in Tembhurni