विकल्यानंतरच कसा येतोय कांद्याला भाव? शेतकरी चक्रावले. 

abd jalna.jpg
abd jalna.jpg

कुंभार पिंपळगाव (जालना) : आधी लॉकडाउनमध्ये भीतीने शेतकऱ्यांनी कांदा चार ते पाच रुपये किलोने विकला. अनेक शेतकऱ्यांच्या कांदाचाळी मोकळ्या झाल्या. आता बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे कांदा नाही. विकल्यानंतरच कांद्याला भाव मिळत असल्याने शेतकरीही चक्रावले आहेत. एकीकडे व्यापाऱ्यांची चांदी होत असताना उत्पादकांना मात्र कवडीचाही फायदा होत नसल्याचे विदारक चित्र आहे. 

परिसरातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. काही शेतकरी बियाणे निर्मितीसाठी कांदा लागवड करतात. विशेषतः पिंपरखेड(ता.घनसावंगी) यात अग्रेसर आहे. पिंपरखेडची आधी उसाचे गाव अशी ओळख होती, आता मात्र कांद्याचे गाव अशी ओळख झाली आहे. गावात दरवर्षी ५०० ते ६०० ट्रक कांदा उत्पादन होते. हा कांदा शेतकरी बंगळुरु, हैदराबाद, जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबईच्या बाजारात विक्री केला जातो.

गावात जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांकडे काहीना काही तरी कांद्याचे क्षेत्र असतेच. यावर्षी मात्र उत्पादन मोठे झाले आणि कोरोनाचे लॉकडाउन सुरू झाले. यामुळे कांदा विकायचा कसा हाच प्रश्‍न अनेकांना पडला. काही शेतकऱ्यांनी कांद्यावरून नांगर फिरवला, खत केले तर काहींनी चार ते पाच रुपये किलोने गावोगाव फिरून माल विकला. आता सारे चित्रच एकदम पालटले आहे. बाजारात कांद्याच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे, मात्र शेतकऱ्यांकडे माल शिल्लक नाही, यामुळे वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होत नसल्याचे चित्र आहे. काही शेतकऱ्यांजवळ थोडाबहुत कांदा शिल्लक आहे. मात्र कांद्याचे भाव तेजीतच असतील याचीही शाश्‍वती नाही. 

शेतकरी म्हणतात...! 

मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले यामुळे बाजारात कांदा नेता आला नाही. कांद्याला चार ते पाच रुपये किलोचा भाव झाला. सर्वत्र लॉकडाउन असल्याने गाव बंदीमुळे इतर गावातही कांदा विकता आला नाही. मातीमोल भावाने कांदा द्यावा लागला. आता त्याच कांद्याला ६० ते ७० रुपये किलोचा भाव आला. दैवाने दिले पण कर्माने नेले अशीच गत झाली. लागवड, काढणी, बियाणे खर्चही निघाला नाही. 
- भगवान देवकते, शेतकरी, पिंपरखेड. 

लॉकडाउनच्या काळात कांदा विकला गेला नाही, मालाचे मोठे नुकसान सहन केले, दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. आता कांद्याला मागणी आहे, मात्र परदेशातून कांदा आयात झाल्यास, आवक वाढल्यास भाव घसरतील. परिणामी कांदा ठेवलेल्या उत्पादकांचे मोठे नुकसान होईल. 
-भरत कबाडे, शेतकरी, अरगडे गव्हाण. 

परिसरात अनेक शेतकरी बियाणे निर्मितीसाठी कांदा लागवड करतात. एखाद्या कंपनीशी करार करून त्याच कंपनीला बियाणे दिले जाते. यावर्षी लॉकडाउनमुळे बियाण्याला फक्त ५०० रुपये किलोचा भाव मिळाला, तर बाजारात हेच बियाणे ८०० ते हजार रुपये किलोने विकले गेले. प्रक्रिया झाल्यानंतर हेच बियाणे आठपट अधिक दराने शेतकऱ्यांना कंपनीकडून चार हजार रुपये किलोने घ्यावे लागले. शेतात बियाणे लावले मात्र परतीच्या पावसाने उगवलेली रोप सडून गेलीय आता बियाणेही मिळेना, पुन्हा भाववाढ झाली आहे. आलेल्या बियाण्याचा दर्जाही चांगला नाही, उगवण शक्तीही नाही यामुळे लागवडीची भिती वाटत आहेत. 
-विष्णु आनंदे, शेतकरी, कुंभार पिंपळगाव. 

(Edited By Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com