विजेच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण 

भोकरदन : हरभरा पिकाला पाणी देताना शेतकरी.  
भोकरदन : हरभरा पिकाला पाणी देताना शेतकरी.  

भोकरदन (जि.जालना)  -   परतीच्या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असतानाही खचून न जाता रब्बीची पेरणी केली. मात्र, ही रब्बीचे पिके आता विजेच्या लंपडावामुळे पाणी देता येत नसल्याने धोक्‍यात आली आहे. शेतकरीही त्यामुळे हैराण झाले आहेत. 

शेतामध्ये वीज केव्हाही जाते आणि केव्हाही येते. अघोषित भारनियमनामुळे शेतकरी वैतागले आहेत. शेतीसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा सुरू असतो. मात्र, या वेळापत्रकातही कधी वीज गुल होईल आणि कधी येईल याचा भरवसा नाही. मुबलक जलसाठा उपलब्ध असतानाही केवळ विजेअभावी रब्बीच्या पिकांना पाणी मिळत नाही. परिणामी गहू, ज्वारी, हरभरा, हिवाळी मका आदी रब्बीची पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे महावितरणने चोवीस तास वीज द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

जीव धोक्‍यात घालून कामे 
अनेकदा शेतकऱ्यांना रात्रभर पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना साप, विंचू, जंगली प्राणी हल्ला करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा अवस्थेतही शेतकरी जीव धोक्‍यात घालून रात्री रब्बीची पिके जगविण्यासाठी धडपडत आहे. 

तालुक्‍यात 42 हजार हेक्‍टरवर पेरणी 
आतापर्यंत भोकरदन तालुक्‍यात जवळपास 42 हजार हेक्‍टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये नऊ हजार 670 हेक्‍टरवर गहू, सात हजार 354 हेक्‍टरवर शाळू, नऊ हजार 874 हेक्‍टरवर मका, 15 हजार 124 हेक्‍टरवर हरभरा, दहा हेक्‍टरवर करडई, तीन हेक्‍टरवर सूर्यफूल, पाच हेक्‍टरवर मोहरीची पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांच्या भरणीसाठी डिझेल इंजिनचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी भरपूर आहे. मात्र, वेळेवर वीज मिळत नसल्याने अडचणी येत आहे. 
- उत्तम साळवे, शेतकरी, कुकडी 

परतीच्या पावसाने भरपूर नुकसान झाले. पाण्याचा प्रश्न मिटला. सध्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. मात्र वीज कधी गुल होईल याचा नेम नाही. विजेचा प्रश्न मार्गी लागावा हीच अपेक्षा 
- गजानन वाघमारे, शेतकरी, मलकापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com