coronavirus : कर्जमुक्तीसाठी २८ हजार शेतकऱ्यांना पाहावी लागणार मार्च संपण्याची वाट 

दत्ता देशमुख
Tuesday, 17 March 2020

  •  आधार केंद्र बंद; प्रमाणीकरण करता येणार नाही 
  •  जिल्हाधिकाऱ्यांची मंदिर विश्वस्त, मौलवींसोबत बैठक 
  •  अभ्यागतांना भेट देऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 
  •  प्रवासी घटले; शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे ओस 

बीड - कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासन विविध पावले उचलत आहे. याचाच भाग म्हणून आधार केंद्र बंद ठेवण्याचे आदेश रविवारी (ता. १५) दिल्याने सोमवारपासून (ता. १६) आधार प्रमाणीकरण प्रक्रिया बंद झाली. त्यामुळे आता २८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम खात्यावर येण्यासाठी मार्च संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.

कोरोना विषाणूचा जिल्ह्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही; परंतु भविष्यातील संकट टाळण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. दरम्यान, सोमवारपासून शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, सिनेमागृहे ओस पडलेले दिसले. प्रवाशांचीही संख्या घटल्याने बसस्थानकांतही नेहमीपेक्षा गर्दी कमी झाली आहे. 
कोरोनाचा परिणाम शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेवरही झाला आहे. कोरोनामुळे २८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम खात्यावर पडण्यासाठी एप्रिल उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा - परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत बंद

शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी येाजनेचा लाभ जिल्ह्यातील तीन लाख तीन हजार ९२५ शेतकऱ्यांना भेटेल असा अंदाज आहे. दरम्यान, सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या कर्जमाफीच्या यादीत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार ५५९ शेतकऱ्यांचा समावेश असून यातील एक लाख ५२ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

यातील काही शेतकरी वगळता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर ८११ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधार केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने आधार प्रमाणीकरण होणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम येण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेलच असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers have to wait for debt relief