
१,४४० कोटींची रक्कम जमा, दोन लाख ५२ हजार शेतकऱ्यांची माफी
बीड : महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी महात्मा ज्योतीराव फुले पीक कर्जमाफीतून जिल्ह्यातील बँकांच्या तिजोरीत तब्बल १४४० कोटी रुपये आल्याने तिजोऱ्या फुल्ल झाल्या आहेत. माफीसाठी आतापर्यंत दोन लाख ६५ हजारांवर शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून दोन लाख ५२ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यांवर माफीची रक्कम आली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीमुळे जिल्हा बँकेचीही दैना फिटली असून या बँकेलाही तब्बल ३६१ कोटी रुपये माफीच्या माध्यमातून मिळाले आहेत. तर, सर्वाधिक माफीची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीत पडली असून ही रक्कम तब्बल ५८२ कोटी आहे. मात्र, पीक कर्जमाफीच्या माध्यमातून तिजोऱ्या फुल्ल झालेल्या असतानाही पीक कर्ज वाटपात बँकांकडून आखडता हात घेतला जात आहे. अद्यापही ५० हजारांवर शेतकरी माफीच्या प्रतिक्षेत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
निवडणुकीदरम्यान शिवसेनेसेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन प्रचार सभांतून दिले. तत्कालिन महायुती सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मिळालेली माफी शेतकरी हिताची नसल्याचाही आरोप केला. योगायोगाने याच तीन पक्षांचे सरकार सत्तेत आले. मात्र, माफी देताना या सरकारनेही पुर्वीच्या महायुती सरकारचाच कित्ता गिरवत काही नियम आणि अटी घातल्या. एका विशिष्ट मुदतीतील दोन लाख रुपये पीक कर्जाला माफी दिली. दरम्यान, यात तीन लाख तीन हजारांवर शेतकरी पात्र ठरले. आतापर्यंत दोन लाख ६५ हजार ८२१ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून यातील दोन लाख ६० हजार ६९३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. आतापर्यंत दोन लाख ५२ हजार ३९६ शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाच्या खात्यावर १४३९ कोटी ५१ लाख रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, अद्याप पन्नास हजारांवर शेतकरी पीक कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. पात्र ठरलेल्या यादीतील पाच हजारांवर शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणिकरणही झाले नाही.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
बँकांच्या तिजोऱ्या फुल्ल; डीसीसीची दैना फिटली
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी पीक कर्जमाफी योजनेतून आतापर्यंत दोन लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १४३९ कोटी ५१ लाख रुपये जमा झाले आहेत. या रकमांनी बँकांच्या तिजोऱ्या फुल्ल झाल्या आहेत. यामुळे जिल्हा बँकेचीही दैना फिटली आहे. या बँकेला तब्बल ३६१ कोटी रुपये मिळाले आहेत. तर, सर्वाधिक माफीची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला भेटली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेलाही तब्बल ३३५ कोटी रुपये मिळाले असून बँक ऑफ महाराष्ट्रला ५५ कोटी ६४ लाख रुपये मिळाले आहेत. पीक कर्जमाफीच्या माध्यमातून तिजोऱ्यांत पैशाची रेलचेल झालेली असतानाही बँकांकडून पीक कर्जासाठी हात आखडलेलाच असल्याचे चित्र आहे.
महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे ५८६ कोटी अधिक
दरम्यान, मागच्या महायुती सरकारनेही शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली. मात्र, या योजनेच्या अटीच जाचक असल्याने त्याचा लाभ मर्यादीत राहीला. या योजनेतून जिल्ह्यातील एक लाख ८२ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपयांचा लाभ झाला होता. आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले पीक कर्जमाफी योजनेतून आतापर्यंत १४३९ कोटी रुपयांचा लाभ लाभ झाला आहे. म्हणजेच मागच्या पेक्षा आतापर्यंत ५८६ कोटी रुपयांची रक्कम अधिक मिळाली आहे. आणखीही ५० हजारांवर पात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांची रक्कम आल्यानंतर मागच्या पीक कर्जमाफीच्या रकमेच्या दुपटीपर्यंत आकडा जाऊ शकतो.
(संपादन-प्रताप अवचार)