शेतकऱ्यांनो अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत, बियाणे खरेदी करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्‍हा स्‍तरावर एक, तालुका स्‍तरावर पाच, अशा सहा निवारण समित्या स्‍थापन करण्यात आल्या आहेत.  प्रत्‍येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी या फोनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

हिंगोली : खरीप हंगाम जवळ आला असून सध्या बियाणे, खत, कीटकनाशके शेतकरी खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांनी गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडून खत, बियाणांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

बनावट भेसळयुक्‍त बियाणे, खत, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्‍या पावतीसह खरेदी करावी. पावतीवर शेतकऱ्यांची व विक्रेत्याची स्‍वाक्षरी, मोबाइल नंबरची नोंद करावी, पीक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी. 

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात आढळले चार मानवी सांगाडे

पॉकिटावरची अंतिम मुदत पाहूण घ्यावी

खरेदी केलेल्या बियाणाचे वेस्‍टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती, त्‍यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत सांभाळून ठेवावे, भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पाकिटे सीलबंद असल्याची खात्री करा, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहूण घ्यावी.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार नोंदवा

 कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्‍त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, कीटकनाशके अंतिम मुदतीचे आतील असल्यास खात्री करावी, शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्याची लेखी तक्रार तत्‍काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

तक्रार निवारण समिती स्थापन

शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कृषी विभागामार्फत जिल्‍हा स्‍तरावर एक, तालुका स्‍तरावर पाच, अशा सहा निवारण समित्या स्‍थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्‍येक कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे, कृषी विकास अधिकारी एन. आर. कानवडे यांनी केले आहे.

टोळ धाड कीड प्रतिबंधासाठी मशाल पेटवून धूर करावा

हिंगोली : राज्यात वाळवंटी कीड (टोळधाड, नाकतोडे) आली असून सध्या विदर्भात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दक्षता म्हणून शेतात कडुनिंब, धोतरा इतर तण किंवा पालापाचोळा जाळून धूर व शेकोटीचा वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोंखडे यांनी केले आहे.

येथे क्लिक कराआता गणनिहाय अधिकारी पुरविणार कोरोनाची माहिती

थव्याना एका दिशेने पळण्याची सवय

टोळ धाडीचा बंदोबस्‍त करण्यासाठी शेतात टीन डबे, प्लॅस्टिक बॉटल, वाद्य व इतर साहित्याचा वापर करावा. शेतात कडुनिंब, धोतरा इतर तण किंवा पालापाचोळा जाळून धूर व शेकोटीचा वापर करावा, त्यामुळे टोळधाड शेतात बसणे टाळेल. थव्याना एका दिशेने पळण्याची सवय आहे. त्‍यामुळे थव्याच्या वाटेवर ६० सेंटीमीटर रुंद व ७५ सेंटीमीटर चर खोदून त्‍यात या पिलांना पकडता येते.

सुरक्षा किटचा वापर करावा

 टोळ सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुडुपांवर जमा होत असल्यामुळे अशा वेळी शेतात मशाल पेटवून धूर केल्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. थव्याच्या स्‍थितीत पिलांची संख्या जास्‍त असल्यास पाच टक्‍के लिंबोळी अर्क किंवा लिंबोळी तेल ५० मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करता येते. शिवाय गरजेनुसार क्‍लोरोपारिफॉस वीस टक्‍के प्रवाही २४ मिली अधिक दहा लिटर पाण्यात टाकून त्‍याची फवारणी करावी. फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करावा, असे आवाहन श्री. लोंखडे यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Should Buy Fertilizers And Seeds Only From Authorized Vendors Hingoli News