रिमझिम सरींवरच कसेबसे तगले पीक

अरुण ठोंबरे
रविवार, 12 जुलै 2020

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात पावसाच्या केवळ रिमझिम सरी पडल्या. त्यावरच कसेबसे पीक तग धरून आहे; मात्र पावसाला जोर नसल्याने परिसरातील तलाव, ओढे अजूनही कोरडे आहेत.

केदारखेडा (जि.जालना) -  पावसाने उघडीप दिल्याने शेतात मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. परिसरात सध्या कपाशी, मुगाचे पीक बहरलेले आहे. पिकांत शेतकरी कोळपणीचे कामे करताना दिसत आहेत. अजूनही शेतकरी, ग्रामस्थांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात पावसाच्या केवळ रिमझिम सरी पडल्या. त्यावरच कसेबसे पीक तग धरून आहे; मात्र पावसाला जोर नसल्याने परिसरातील तलाव, ओढे अजूनही कोरडे आहेत. उगम क्षेत्रात पडलेल्या पाण्यामुळे पूर्णा नदीपात्रात काही प्रमाणावर पाणी आहे. मात्र परिसरातील विहिरींसह कूपनलिकांच्या पाणीपातळीत पुरेशी भर पडलेली नाही.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

सध्या कपाशी, मूग, काही ठिकाणी सोयाबीनचे पीक बहरात आलेले आहे. यंदा अनेकांचे सोयाबीनचे पीक उगवले नाही, त्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी दिसत आहे. 
सध्या पावसाची उघडीप असल्याने शेतातील कपाशीच्या शेतात खुरपणीच्या कामांत महिला व्यस्त आहेत. शिवाय अनेक ठिकाणी बहरलेल्या मुगाच्या पिकांमध्ये कोळपणीची कामे शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

कोरोनामुळे शहरी भागातून आलेले ग्रामस्थही शेतातील कामांत मदत करीत आहेत. सध्या अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत असून बँकांमधून पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers waiting for rain