शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

photo
photo

हिंगोली : जिल्ह्यात एक लाख ९० हजार ३१९ शेतकरी लाभार्थी असून ५७० कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, कोणत्याही वित्तसंस्था किंवा बँकेकडून किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेता आला नाही, अशा शेतकरी लाभार्थींसाठी किसान कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. दीक्षित, नाबार्ड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आदींची उपस्थिती होती. या वेळी श्री. जयवंशी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील लाभार्थींना पीककर्ज वाटप करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या वित्त विभागाकडून देण्यात आल्या होत्या. 

५७० कोटी रुपयांची कर्जमाफी

त्यानुसार ही मोहीम जिल्ह्यात बँकेमार्फत राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेतला आहे. परंतु, त्यांना वाढीव पत मर्यादा मिळू शकते, आजपर्यंत कुठलेही पीककर्ज घेतले नाही, अशा शेतकऱ्यांनी शेतीविषयक कागदपत्र घेऊन नजीकच्या बँक शाखेशी संपर्क करावे.’’ जिल्ह्यात एक लाख ९० हजार ३१९ लाभार्थी असून ५७० कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे. जिल्ह्यातील ५१७ गावांत आपले सरकार सेवा केंद्र जोडले जाणार आहे. तसेच आपले सरकार केंद्रावरून तक्रारदेखील करता येणार आहे. 

प्रोसेसिंग व निरीक्षण खर्चासाठी सवलत

याशिवाय तालुकानिहाय प्रशिक्षण दिले जाणार असून त्याची जबाबदारी तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. तसेच तीन लाखांपर्यंतच्या पत मर्यादेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या प्रोसेसिंग व निरीक्षण खर्चासाठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दाखल केल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांना कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.

आधार लिंक करण्याचे आवाहन

जिल्ह्यात ही मोहीम आठ ते २३ फेब्रुवारी दरम्यान, राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे येऊन आधारलिंक करून बँकेना सहकार्य करण्याचे आवाहनदेखील श्री. जयवंशी यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com