'तो' प्रवास अखेरचा ठरला; ओढ्याच्या पुरात वाहून गेल्याने बाप-लेकीचा मृत्यू !   

दीपक सोळंके
Sunday, 20 September 2020

  •  भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील दुर्दैवी घटना !  
  • काही क्षणात ही घटना घडल्याने गावावर शोककळा.  
  • किराणा सामान आणायला आले होते गावात, हा प्रवास दोघांसाठी ठरला शेवटचा.

भोकरदन (जि.जालना): ओढ्याला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेल्याने बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.१९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे घडली. विलास शालीक सहाणे (वय ३०) व कल्याणी विलास सहाणे (वय ७) असे या दुर्घटनेत मृत झालेल्या बाप-लेकीचे नाव आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सोयगाव देवी येथील विलास सहाने हा युवक त्याच्या कुटुंबासह सोयगाव देवी परिसरातील त्याच्या स्वतःच्या शेतात राहायला आहे. शनिवारी रात्री किराणा सामान घेण्यासाठी तो सात वर्षाच्या मुलीसह दुचाकीने गावात आला होता. यादरम्यान सोयगाव देवी व परिसरात दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील लहान मोठ्या ओढ्या-नाल्यांना मोठा पूर आला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पावसाचा जोर ओसरल्यावर विलास मुलीसह किराणा सामान घेऊन घराकडे परतत असताना रस्त्यावर आडव्या असलेल्या पोतका ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा दुचाकीवरचा ताबा सुटला व तो मुलीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. बराच वेळ होवूनही विलास व मुलगी घरी न आल्याने घरच्यांनी गावात फोन लावून विचारणा केली. गावातील नागरीकांनी या पुलाकडे धाव घेवून पाहणी केली. विलास हा पुलावरुन वाहुन घेल्याचा अंदाज गावकऱ्यांना आल्याने रात्री दहा वाजल्यापासून शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान दुचाकी पुलाच्या जवळच आढळली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर पहाटे तीन वाजता कल्याणीचा मृतदेह पुलाजवळील केटीव्हेअरजवळ आढळला. विलासचा मात्र रात्रभर शोध घेवूनही थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२०) तब्बल बारा तासानंतर सकाळी ११ वाजता तीन किमी अंतरावर वालसा येथील पुलाजवळ विलासचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गावात पेटली नाही एकही चूल
या घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. कल्याणीवर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. तर तिचे वडील विलास सहाणे यांच्यावर दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावात एकही चूल पेटली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father and daughter died due to floods in Bhokardan taluka