
पाथरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एक फौजदार व एका कर्मचाऱ्यास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बुधवारी (ता.दोन) रोजी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले.
पाथरी ः पाथरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एक फौजदार व एका कर्मचाऱ्यास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बुधवारी (ता.दोन) रोजी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले. आर्थिक व्यवहार करणाऱ्या पोलिसांवर पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केल्याने सामान्यातून चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
पाथरी पोलिस ठाण्यातील फौजदार टोपाजी कोरके यांनी एका घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी नगरसेवक आयुब उर्फ लालू खान यांच्याकडून त्याच्यासह पाच नातेवाईकांना जमानत होण्यासाठी सहकार्य पाहिजे असल्यास पैशाची मागणी करित रक्कम स्विकारुन पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक श्री.मीना यांनी फौजदार टोपजी कोरके यांना निलंबित केले.
बेकायदेशीर कृत्य केल्याने निलंबन
दुसऱ्या घटनेत रमेश पांडुरंग मुंडे या पोलिसास निलंबित केले. कर्मचारी मुंडे यांनी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झालेल्या एका गुन्ह्यातील व्यक्तीस दिवसभर ठाण्यात थांबवून ठेवले व रात्री जमानत मिळवून देण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली. पैसे देण्यास होकार मिळाल्यानंतर एका फॉर्मवर सह्या घेतल्या व उद्या जमानत करून देतो असे म्हटले. त्यानंतर काही वेळाने तेथील होमगार्ड केशव मुंडे यांच्यामार्फत जमानतीसाठी संबंधित व्यक्तीस तीस हजारांची मागणी केली. इतकी रक्कम देण्यास तयार नसल्याने त्यास रात्रभर पोलिस कोठडीत ठेवण्याचे बेकायदेशीर कृत्य केले असे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी नमूद केले. विशेष म्हणजे पोलिस कर्मचारी मुंडे बाभळगाव बिटात कार्यरत नसतानाही त्या गुन्ह्याशी त्यांचा काही संबंध नसताना त्यांनी होमगार्ड मुंडे मार्फत तीस हजार मागत बेकायदेशीर कृत्य केल्याने रमेश पांडुरंग मुंडे यास निलंबित केले. यामुळे पाथरी पोलिसात खळबळ माजली असून आर्थिक व्यवहार केल्याच्या आणखी किती घटना उजेडात येतात याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे धरणे
आर्थिक व्यवहाराला बसणार चाप
वर्षभरात पाथरी पोलिस ठाण्यात पूर्णवेळ आधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिला नाही. याचा फायदा घेत काही अधिकारी व कर्मचारी येणाऱ्या तक्रारीत व्यवहार होत होते. परंतू, पोलिस अधीक्षकांच्या कारवाईमुळे ठाण्यातील आर्थिक व्यवहाराला चाप बसेल अशी प्रतिक्रिया नागरिकांतुन व्यक्त होत आहे.
हेही वाचा - दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यात चक्का जाम, निदर्शने
जुनेद खान दुर्राणी यांची तक्रार
एका प्रकरणात माजी नगराध्यक्ष जुनेद खान दुर्राणी यांनी पोलिस निरीक्षक व एका कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून त्याची चोकशी सुरू आहे.
संपादन ः राजन मंगरुळकर