
धक्कादायक! मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात तब्बल 50 सापांचा मृत्यू
उमरगा (जि.उस्मानाबाद) : परतीच्या पावसाने नदी, ओढे, नाल्यात पाण्याची उपलब्धता झाल्याने पाण्यातील जीवमात्रांचीही रेलचेल सुरू आहे. शहराजवळील कोरेगाव (Umarga) रस्त्यावरील नाल्यातील पाण्यात मासे पकडण्यासाठी लावलेली जाळी बिचाऱ्या सापांच्या जीवावर (Snake) बेतली आणि जवळपास पन्नास ते साठ सापांचा मृत्यु झाल्याचा प्रकार रविवारी (ता. दोन) सकाळी नागरिकांना दिसून आला. साप म्हटलं की, अंगावर शहारे येतात. मात्र साप प्राण्यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. नागदेवची आपण पुजा करतो, नागोबाचे मंदिरे (Osmanabad) आहेत. साप हा शेतीत असल्याने तो अप्रत्यक्षपणे शेतकऱ्याचा मित्रच असतो. तो स्वतःहुन चावा घेत नाही. त्याच्या जीवावर प्रसंग येण्याची चाहुल लागताच तो सावध होऊन एक तर चावा घेतो, नाही तर निघून जातो. पण सापांच्या बाबतीत दुर्दैवी प्रसंग घडला आहे.(Fifteen snakes Died After Trapped In Fishing Net In Umarga Of Osmanabad)
हेही वाचा: उस्मानाबाद, लातूरमध्ये वेळ अमावास्या शेतकऱ्यांनी केली उत्साहात साजरी; पाहा व्हिडिओ
कोरेगाव साठवण तलाव ओसंडुन वाहिल्याने शहराजवळील कोरेगाव रस्त्यावरील नाल्यातील पाण्यात पाणी आहे. सांडव्यावाटे पाणी गेल्याने तलावातील छोटे मासे अथवा त्याचे बीज वाहुन गेले आणि त्यांचा प्रवास नदी, नाल्यात सुरू झाल्याने मासे पकडून त्याची विक्री करणारे काही व्यक्ती पाण्यात जाळे लावताहेत. शनिवारी (ता. एक) दुपारी दोन व्यक्तींनी पुलाच्या बाजूच्या पाण्यात जाळी लावली. जाळ्यात भरपूर मासे उपलब्ध होतील असे त्या व्यक्तींना वाटले. परंतु तेच व्यक्ती सापांचे मारेकरी ठरले. जवळपास दीड ते दोन फुट लांबीचे आणि काही कमी लांबीचे विविध जातींचे साप त्या जाळ्यात अडकले. रात्रभर त्या जाळ्यात साप तडफडत होते. खेकड्यांची संख्याही अधिक असल्याने सापांना खेकड्यांनी चावा घेतलेला असावा. असे चित्र मृत सापाच्या शरीरावर दिसून येत होते.
सर्पमित्रासह तरूणांनी काढली जाळी !
रविवारी सकाळी सहाच्या सुमारास पाण्यावर साप तरंगत असल्याचे लक्षात आल्यानंतर ओमकार बिराजदार यांनी मित्रांना फोन केला. काही जणांनी सर्पमित्रांना फोन केला. सर्पमित्र युवराज गायकवाड, शिवराज गायकवाड, सुदर्शन चव्हाण, हरिश चव्हाण, सादिक लंगडे, लिंबाजी जमादार आदी तरूणांनी जाळ्यात मृत झालेल्या सापांना बाहेर काढुन त्याची एका ठिकाणी विल्हेवाट लावली. जाळीही अर्ध्यातच तुटल्याने काही साप पाण्यातच मृत अवस्थेत दिसले.
हेही वाचा: वेळा अमावास्याला शेतकऱ्यांनी केली 'लक्ष्मी'ची पूजा,सर्वत्र उत्साहाचे वातावरण
मासे पकडण्याची पद्धत असते, ते त्या व्यक्तींना माहित असतानाही रात्रभर जाळे ठेवणे योग्य नाही. दहा, पंधरा किलो मिळणारे मासे पाण्याबाहेर काढल्यावर मरणारच होते. मात्र पन्नास ते साठ सापांचा जीव गेला त्याचे काय ? वन विभागाने अशा चुकीच्या प्रकारावर लक्ष ठेवायला हवे.
- नितीन सुर्यवंशी, उमरगा
ज्या सापांना नागरिकांनी सतर्कता बाळगुन जीवदान देण्यासाठी आम्हाला बोलावले जाते. मात्र आम्हा सर्पमित्रावर आज दुर्दैवाची वेळ आली. मृत साप बाहेर काढुन त्याची विल्हेवाट लावावी लागली.
- युवराज गायकवाड, सर्पमित्र, उमरगा
Web Title: Fifteen Snakes Died After Trapped In Fishing Net In Umarga Of Osmanabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..