अमिताभ बच्चन, सोनी वाहिनीवर गुन्हा दाखल करा; आमदार अभिमन्यू पवार यांची तक्रार

1Amithab_B
1Amithab_B

लातूर  : सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातून हिंदू व बौद्ध धर्मियांच्या भावनाला हानी पोहोचवली गेली आहे. त्यामुळे या कृत्यासाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क लिमिटेड तसेच अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. सोनी ही लोकप्रिय वाहिनी आहे. कोट्यवधी लोक ती पाहतात. या वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्षांपासून दाखवला जात आहे. हा कार्यक्रम हा एक ‘गेम शो’ आहे. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असतात. यात मोठ्या रक्कमेची बक्षीसेही दिली जातात.

ता.३० आॅक्टोबर २०२० रोजी रात्री नऊ वाजता झालेल्या या कार्यक्रमात सहा लाख ४० हजार रुपयांसाठी कार्यक्रमात सहभागी व्यक्ती येजवाडा विल्सन व अनुप सोनी यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘ता. २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बी.आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रति जाळल्या,’ असा हा प्रश्न होता. त्यात विष्णुपुराण, भगवद्गीता, ऋग्वेद व मनुस्मृती असे चार पर्यायी उत्तर देण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार व अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाने अनेक हिंदू व बौद्ध धर्मीय व्यक्तींना धार्मिक व मानसिक आघात पोहोचलेला आहे. भारतीय दंडसंहितेच्या अनेक कलमान्वये त्यांनी वरील गुन्हा केला आहे, असेही श्री.पवार यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


हा कार्यक्रम पूर्ण भारतभर प्रसारित झालेला आहे. तो लाखो लोकांनी पाहिला आहे. तो कार्यक्रम लातूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतही प्रसारित झालेला आहे व तो गुन्हा असल्याने गुन्हा नोंद करण्याचे अधिकार पोलिस अधिकाऱ्यांना आहेत. असा प्रश्न तयार करण्यामागे व विचारण्यामागे व प्रसारित करण्यामागे केवळ हिंदू धर्म, धर्मग्रंथ, धर्मनिष्ठा यांचा अपमान करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणे हाच उद्देश स्पष्ट होतो. प्रश्नास दिलेले सर्व पर्याय फक्त पवित्र हिंदू धर्मग्रंथाचेच देवून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच आहेत अशी भावना सर्वसामान्यामध्ये पसरवणे व जाती जातीमध्ये , धर्माधर्मामध्ये विशेषतः हिंदू व बौद्ध धर्मियांमध्ये वैमनस्य पसरविणे हाच उद्देश स्पष्ट होतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा तत्कालीन हिंदू धर्मावरील , मनुस्मृतीवरील राग, मतभेद यांना उजाळा देऊन इतिहासातील जखमांच्या खपल्या काढून सौहार्दपणे एकमेकांसोबत राहणाऱ्या हिंदू बौद्ध धर्मियांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रश्न सदर स्वरुपात विचारला गेला आहे. या प्रश्नास हिंदू धर्माचेच पर्याय देवून हिंदू धर्माबद्दल इतर धर्मियांच्या व प्रेक्षकांच्या मनात हीन भावना तयार करण्याचा प्रयत्न हा प्रश्न करतो. त्यामुळे भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ (ए), २९०, २९५ (ए), २९८, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा केलेला आहे. त्यामुळे सोनी टीव्ही व अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही श्री.पवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. श्री. पवार यांनी ॲड. विशाल दीक्षित यांच्यामार्फत ही तक्रार दिलेली आहे.


आमदार अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्ही व अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या संदर्भात भावना दुखावल्यासंदर्भात तक्रार दिलेली आहे. या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
- निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com