नियती, तुच सांग आमचा काय गुन्हा? वडिलानंतर आईचेही छत्र हरविलेल्या दोन शाळकरी मुलांचा आर्त सवाल

Ausa News
Ausa News

औसा (जि.लातूर) : एक गुंठा जमीन नाही. काम केले तरच चुल पेटते अशी स्थिती. वडील सालगडी म्हणुन कामाला आणि आई मजुरी करुन संसाराला हातभार लावत होती. सात वर्षांपूर्वी वडीलांचे छत्र हरवले. मोलमजुरी करुनही लेकरांना शिकविण्याचे स्वप्न उराशी बाळगुन राबनारी आईही ऐन दिवाळीत झालेल्या अपघातात सोडून गेली. खेळण्या बागडण्याच्या दिवसांत अनाथ झालेल्या मुलांना जगण्यासाठी काय करावे लागते हेही माहीत नाही. वडीलांनतर आईचेही छत्र हिरावणाऱ्या नियतीला भादा गावातील दोन अनाथ मुले प्रश्न विचारत आहेत की 'नियती तुच सांग यात आमचा काय गुन्हा'? पुढे शिक्षण पूर्ण करायचे की, जगण्याचा पर्याय शोधायचा हा यक्ष प्रश्न भाद्याच्या स्वाती कुंडलीक हजारे (वय १७) व तिचा भाऊ विशाल हजारे यांना पडला आहे.


सालगडी म्हणुन काम करणाऱ्या कुंडलीक हजारे व सुवर्णा यांना एक मुलगी स्वाती आणि मुलगा विशाल ही दोन अपत्ये आहेत. सात वर्षांपुर्वी कुंडलीक हजारे यांचे निधन झाले. दोन्ही मुलांना आपल्या पंखाखाली घेत सुवर्णा हजारे यांनी मोलमजुरी करुन मुलांना शाळेत घातले. शासनाकडून निराधार योजनेचे मिळणारे मानधन आणि दिवसभर शेतात राबुन मिळणारी मजुरी यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह. मुलगी स्वाती ही संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय लासोना (जि.उस्मानाबाद) येथे बारावीत शिकते, तर मुलगा विशाल हा गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीला आहे. नरकचतुर्थी दिवशी सुवर्णा हजारे या समुद्रवाणी येथील भावाकडे भावाच्या मुलाच्या बारशाला जात होत्या.

यात टेम्पो पलटी होऊन त्यांचा मृत्यु झाला. पहिले वडील आणि ऐन दिवाळीत आईलाही या दोन लेकरांपासुन नियतीने हिसकावुन घेतले. वडिलानंतर भक्कम आधार देत असलेल्या आईच्या निधनानंतर ही दोन मुले आता उघड्यावर पडली आहेत. वर्ष दोन वर्षात मुलीचे हात पिवळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आईने आात जगाचा निरोप घेतला. तिचे हात कसे पिवळे होणार आणि विशालचे भवितव्य कोण ठरविणार हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सर्व बाजुंनी उघडी झालेल्या या मुलांना गरज आहे त्यांना जीवनाच्या प्रवाहात आणण्याची आणि त्यांची जगण्याची उमेद न खचु देण्याची. नियतीचे कठोर घाव झेलुन आणेकांनी यशाचे शिखर गाठल्याची उदाहरणे जगासमोर आहेत. याही कुटुंबाला जर आधार मिळाला तरच ही दोन्ही मुले पुन्हा उभी राहतील.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com