औशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मटक्याच्या दुकानाला लागले टाळे

crime logo 11.jpg
crime logo 11.jpg

औसा (लातूर) : गेल्या दोन वर्षापासून औसा शहरात सुरू असलेला खुलेआम मटका आणि गल्लोगल्ली लागलेली बुकींची दुकाने नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार घेताच बंद झाली आहेत. यापूर्वी भरपूर अधिकारी जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून आले आणि गेले. मात्र औशातला मटका बंद झाला नव्हता. मात्र पिंगळे यांचा चांगलाच धसका मटाकाबुकीसह हप्तेखोर अधिकाऱ्यांनी घेतल्याचे मटक्याच्या दुकानाला लागलेल्या टाळ्या वरून दिसत आहे. 


'कोणीही येऊ द्या मटका बंद होणार नाही' अशी वलग्ना करणाऱ्या मटका किंगसह हप्ते खाणाऱ्या अधिकाऱ्यांची आता चांगलीच गोची झाली ते जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार घेताच. 

श्री. पिंगळे यांचे काम आणि कडक शिस्त हे सर्वश्रुत आहे. चांगल्या अधिकाऱ्याला प्रोत्साहन आणि पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई, त्याच बरोबर कायदा मोडणाऱ्या विरोधात पोलिसी खाक्या असा कारभार ते चालवतात. त्यामुळेच त्यांनी पदभार घेताच विशेष माणसाकडून सर्व अवैध धंदेवल्याना हिरवा कंदील दाखवे पर्यंत आपले धंदे बंद करण्याचे फर्माण सुनावण्यात आले आहे. दररोज चार ते पाच लाखांच्यावर उलाढाल एकट्या मटक्याच्या व्यवसायातून होत होती आणि त्यातून आपले उखळ पांढरे करून घेतले जात होते. यापूर्वीही औशातील मटका आणि अवैध धंदे बंद करण्याचे भरपूर प्रयत्न झाले मात्र ज्यांच्यावर धंदे बंद करण्याची जबाबदारी आहे. त्यांचेच हात हप्त्याच्या रूपाने यात गुंतले होते. त्यामुळे अनेक मटका बुकी आम्ही कोणाला घाबरत नाही, हप्ते देतो व चालवतो अशी भाषा वापरात होते. पण श्री. पिंगळे यांच्या पदभारानंतर मात्र सगळीकडे शांतता आहे. 

एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांची नुसती इन्ट्रीही अवैध धंद्याचे बंकर आणि त्याला मजबूत संरक्षण देणाऱ्या पोलीस खात्यातीलच अधिकाऱ्यांची कवच कुंडले कशी उद्धवस्त करू शकतात. हे औसा शहर आणि परिसर सध्या पाहता येत आहे. येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या मनमानीला आणि "हम करेसो कायदा" या वृत्तीलाही चांगलाच लगाम लागला आहे. औसा पोलीस खात्यात एव्हढी शांतता आणि कायद्याची राखण होतांना या दोन वर्षात कधीच औसेकरांनी पहिली नव्हती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना न पाहताही औशात त्यांच्या विषयी लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होत आहे. चांगला अधिकारी आल्याने औसा पोलीस अधिकाऱ्यांची जुलमी राजवट संपेल अशी अशाही लोकांना लागली आहे.

थोड़े दिन रुको फिरसे शुरू होंगे
मटका बंद झाल्याने हतबल झालेल्या मटका बुकी थोडे दिवस थांबा.. साहेब नव्याने रुजू झाले आहेत. त्यांचा काळ बघून थोड्याच दिवसात मटका पुन्हा सुरू करू अशी अशी हमी कोणाच्या इशाऱ्या वरून देत आहेत हे कळायला मार्ग नाही. दरम्यान दुकाने बंद असली तरी अजूनही कांही लोक गुपचूप मोबाईलवर मटका घेत असल्याची चर्चाही सुरू आहे. 

अपेक्षाभंग होऊ नये 
बरेच अधिकारी रुजू झाल्यावर अवैध धंद्यावर कडक कारवाईचा बडगा उगारतात आणि नंतर हळू हळू "जैसे थे" परिस्थिती निर्माण होते. औशातील बंद झालेला मटका कमीत कमी श्री. पिंगळे असे पर्यंत तरी बंदच असावा अशी अपेक्षा औसेकर करीत आहेत. थोड्या दिवसांनी पुन्हा बंद अवैध धंदे सुरू झाले तर लोकांचा अपेक्षा भंग होईल अशीही चर्चा औशात सुरू आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com