लॉकडाउनमध्ये चिमुकल्यांनी फुलविली रोपवाटिका

राजेश दारव्हेकर
Thursday, 4 June 2020

नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारणासाठी ‘एक मूल तीस झाडे’ अभियानांतर्गत वृक्षारोपण केल्यास पर्यावरण संतुलनासाठी फायदा होतो. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील चिमुकल्यांनी वृक्षसंवर्धनाचा निर्णय घेतला असून त्यादृष्टिने रोपे तयार करण्यास सुरवात केली आहे.

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. यात शाळा, शिकवणी वर्ग बंद झाल्याने चिमुकले घरात बसून आहेत. यात काही जण छंद जोपासत चित्रकला, रांगोळीत पारंगत होत आहेत. मात्र, येथील तिरुपतीनगरातील चिमुकल्यांनी रोपवाटिका तयार करून लॉकडाउनचा सदुपयोग केला आहे.

लॉकडाउनमुळे लहान मुलांना घराबाहेर जाता येईना. घरातच वेळ घालावा लागत आहे. यामुळे अनेकांची चिडचिडदेखील वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवूण घेत आहेत. काही शाळांनी वर्क फ्रॉम होम सुरू केल्याने त्यात काहीजण मग्न आहेत.

हेही वाचाउदरनिर्वाहाचा प्रश्न, तरीही कोरोनाला हरविण्याची जिद्द 

पाचशेच्या वर फळझाडांची रोपे

 तर काहीजण टीव्ही पाहणे, चित्रकला, रांगोळी, कला कुसरीची कामे करीत आहेत. नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारणासाठी ‘एक मूल तीस झाडे’ अभियानांतर्गत वृक्षारोपण केल्यास पर्यावरण संतुलनासाठी फायदा होतो. ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून येथील अवनी जगताप व अर्णव जगताप यांनी पाचशेच्या वर फळझाडांची रोपे तयार केली आहेत. 

रोपवाटिकेला दिली नावे

गावरान फळं घरी खायला आणल्यानंतर निघणाऱ्या बियांपासून रोपे तयार केली आहेत. यात आंबा, चिंच, रामफळ, हदगा, सीताफळ, काशीबेल, कवूठ, शेतावरी, लिंबोणी आदींचा समावेश आहे. तसेच तिरुपतीनगर येथील राजश्री कावरखे या चिमुकलीने बेल, रामफळ, सीताफळ, लिंबोनीची रोपे तयार केली आहेत. या रोपवाटिकेला अवनी रोपवाटिका, मंगेश रोपवाटिका, राजश्री रोपवाटिका अशी नावे दिली आहेत.

निसर्गाचे महत्त्व कृतित उतरवले

तेलगाव (ता. वसमत) येथील मंगेश राऊत यानेही शेतात फळ झाड रोपवाटिका तयार केली आहे. कोरोनाच्या काळात निसर्गाचे महत्त्व कृतित उतरवले असून मित्र, मैत्रिणींच्या वाढदिवसाला रोपटे भेट देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. तसेच काही रोपटे कॉलनी, शाळा परिसरात लावली जाणार आहेत.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीतुन पुन्हा गुढ आवाज 

वृक्ष लागवड अभियानाला सुरवात

हिंगोली : येथील सद्‍भाव सेवाभावी संस्थेतर्फे वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानाची सुरवात गुरुवारी (ता. चार) तिरुपतीनगर येथे करण्यात आली आहे. ‘आपली हिंगोली - ग्रीन व हेल्दी हिंगोली’ अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

पदाधिकारी उपस्थित

 या वेळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, जालना येथील शिवसेनेचे माजी सभापती मनिष श्रीवास्तव, हिंगोली जिल्हा काँग्रेस प्रवक्ते विलास गोरे, विजय राठोड, राजेश पवार, कृष्णा पवार, सद्‍भावचे अभयकुमार भरतीया यांची उपस्थिती होती.

वृक्ष संवर्धनासाठी काम

दरम्‍यान, सद्‍भाव संस्‍था सातत्याने वृक्ष लागवड करून त्याच्या संवर्धनासाठी काम करत आहे. जिल्हा आणि शहरात संस्थेने लागवड केलेले वृक्ष बहुतांश जिवंत असल्याचे श्री. भरतीया यांनी उपस्‍थितांना सांगितले. या वेळी आमदार राजेश राठोड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowering Nursery In lockdown Hingoli News