बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक रानोमाळ! बीड जिल्ह्यात दहशत

bid ddp 21.jpg
bid ddp 21.jpg

कडा (बीड) : आष्टी तालुक्यातील सुरुडी किन्ही व पारगाव जोगेश्वरी येथे नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात या नरभक्षक बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्याने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक मंगळवारी (ता. एक) पारगाव जोगेश्वरी, वाळुंज परिसरात अहोरात्र शेतशिवार रानोमाळ भटक होते. 

बिबट्याने नागनाथ गहिनीनाथ गर्जे (सुरुडी), स्वराज सुनील भापकर (किन्ही) आणि सुरेखा नीळकंठ बळे (पारगाव जोगेश्वरी) या तीन व्यक्तींचा बळी घेतला. शालन शहाजी भोसले, विजय भोसले, शीलावती दत्तात्रेय दिंडे आणि अभिषेक दत्तात्रेय दिंडे हे बिबट्याच्या हल्ल्या गंभीर जखमी झाले आहेत.

या बिबट्याला पकडण्यासाठी औरंगाबाद, नांदेड, पुणे, जुन्नर तसेच बीडच्या पथकातील जवळपास एकशे पंचवीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. दरम्यान, अजून बिबट्या सापडला नसल्याने आष्टी तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. बिबट्याला वन विभागाने तत्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे. 

नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी 
आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे; तसेच काहींना जखमीही केलेले असल्याने हा बिबट्या पुन्हा मानवी जीवितावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने व सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करा, अथवा ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्य वन संरक्षक अधिकारी नागपूर यांच्यासह औरंगाबाद तसेच विभागीय वन अधिकारी बीड यांच्याकडे मंगळवारी (ता. एक) निवेदनाद्वारे केली आहे. 


बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तालुक्यातील नागनाथ गर्जे, स्वराज भापकर, सुरेखा नीळकंठ बळे यांचा मृत्यू झाला आहे. तर शालन शहाजी भोसले, विजय भोसले, शीलावती दत्तात्रेय दिंडे आणि अभिषेक दत्तात्रेय दिंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या शेतामध्ये तूर, कापूस, ज्वारी ही पिके उभी असून त्यांना पाणी देणे, कीटकनाशक फवारणी करणे, खुरपणी करणे तसेच राखणी करणे ही कामे करणे शेतकऱ्यांना अपरिहार्य आहेत. शेतकरी, शेत मजुरांना सतत शेतात जावे लागत आहे. तथापि बिबट्याचा वावर वाढला असून, त्याच्या प्राणघातक हल्ल्याच्या धास्तीने जनता भयभीत झाली आहे. नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. वनविभागाकडून संरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्यास जेरबंद करा, बेशुद्ध करा किंवा ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे; तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार परवानगी देणे ही एक वैधानिक बाब असल्याने अत्यंत काळजीपूर्वक तसेच उच्च न्यायालय यांचे निर्देशानुसार आपल्या विभागामार्फत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा आणि आष्टी मतदारसंघातील बिबट्यांच्या धास्तीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा मिळेल यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी असेही धस यांनी निवेदनात म्हटले आहे. 
 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com