Big Breaking : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

राम काळगे 
Wednesday, 5 August 2020

  • पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मालावली
  • वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनावर केली होती मात. 

निलंगा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असताना बुधवारी (ता.पाच) रोजी पहाटे निधन झाले. महाराष्ट्राच्या जुन्या फळीतील नेते व एक शिस्तप्रीय व चारीत्र्यसंपन्न नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक होता.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाल्याने नुकतेच त्यांना घरी पाठवण्यात येणार होते. वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनाला हरवणारा योद्धा समजल्या जाणाऱ्या निलंगेकर यांनी मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.
निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ आमदार, निलंगा तालुक्यात शैक्षणिक सुविधा निर्माण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही म्हणून कार्य केले. तळागाळातील जनतेचे कैवारी, राजकारणातील निष्कलंक हिरा अशी ओळख होती. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

'दादा'साहेब (१९३१-२०२०)
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर  राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व. ०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा इथे त्यांचा जन्म झाला. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते. एम.ए. एल. एल. बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. दादासाहेब या नावाने ते सर्वाना सुपरिचित होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याच्या राजकारणातील पितामह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. गांधी घराण्याशी त्यांची जवळीकता असलेले ते काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत नेते होते. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

लातूर जिल्ह्याच्या निर्मितीबरोबर औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ, महाराष्ट्र सदन, राज्यातील विविध प्रकल्प, जिल्हा न्यायालये, अशी अनेक विकास कामे केली आहे. त्यांच्या निधनामुळे राजकारणात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तर लातूर जिल्ह्यानेही एक मोठा नेता गमावला आहे. 'दादा' या नावाला ते उभ्या आयुष्यात अगदी नावाप्रमाणे जगले... अशा 'दादासाहेब' या नावाने सर्वाना परिचित होते. त्यांच्यावर निलंगा येथे बुधवारी ता. ५ रोजी दुपारी निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावाई, सुना नातवंडे असा परिवार आहे. 

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former chief minister shivajirav patil nilangekar no more