बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका 

file photo
file photo

औरंगाबाद : निसर्गाने प्रत्येकांना ज्यांचा त्यांचा अहार ठरवून दिलेला आहे. प्रत्येकजण निसर्गनियमाप्रमाणे ठरवून दिलेला अहार घेत असतो. फक्त माणूसच जिभेचे चोचले पुरवतो आणि भक्ष-अभक्ष्य भक्षण करीत असतो. मात्र, इतरमात्र निसर्ग नियमाला धरून अहार घेत असतात. त्यापैकीच येथील काही जणांची उपजीविका बेडूक आणि उंदरांवर अवलंबून आहे. त्यांना आठवड्यातून एकदा तब्बल ८० बेडूक आणि ३० उंदीर खाण्यासाठी लागतात. यांच्या अहारावरही लॉकडाउनचा परिणाम झाला आहे. 

पावसाळा, हिवाळ्यात बेडकांची डरॉं ऽऽऽ व डरॉं ऽऽऽ व जास्त ऐकायला येते. मात्र, त्यांची संख्या उन्हाळ्यात कमी होऊन जाते. उंदीर तर बाराही महिने उपलब्ध होतात. मात्र, सध्या जगभरात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट आले आहे. मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने बाजारपेठा बंद आहेत. बाजारपेठांचा आणि या अहाराचा संबंध आहे. चार्लस बत्तिसे यांनी सांगितले, की बाजारपेठ सुरू असल्यानंतर उंदीर पकडण्यासाठी दुकाने, धान्याचे गोडाउनमध्ये पिंजरे ठेवून दिले जातात.

कोणाला आवडतात बेडूक तर कोणाला उंदीर 

चार-पाच दिवसांनंतर त्यात अडकलेले उंदीर काढून एकत्रित करून ते ज्यांचे भक्ष्य आहे तिथे नेऊन द्यावे लागते. हे उंदीर आणि बेडूक मराठवाड्यातील आबाल वृद्धांचे आकर्षण असलेल्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयासाठी लागतात. विविध प्रजातीचे पक्षी, वन्यजीव, तृणभक्षी आणि सरपटणारे जीव या प्राणीसंग्रहालयात आहेत.

येथील सर्पालयात सुमारे ५० ते ६० विविध जातीचे साप आहेत. यामध्ये अजगर, घोणस, धुळनागीन, महांडूळ, कंदोर, फुरसे, नाग, इरळे, गवती साप, धामन आदींचा समावेश आहे. प्रत्येकांचे वेगवेगळे आवडते खाद्य. धामन, नाग यांना बेडूक, घोणस, कंदोर, धुळनागीन यांना उंदीर तर अजगरांना कोंबडी आवडत असल्याचे प्रवीण बत्तिसे यांनी सांगितले. 

रात्रीच्यावेळी बेडकांचा शोध 

चार्ल्स बत्तिसे गेल्या २५ वर्षांपासून सर्पालयातील सापांची देखभाल करतात व त्यांना त्यांचे खाद्य देतात. त्यांनी सांगितले, आधीच म्हणतात सापाच्या शेपटीवर पाय पडला तर सापही चावतो तसे खूप काळजीपूर्वक त्यांच्या पिंजऱ्यांची साफसफाई करून त्यांना खायला द्यावे लागते. सध्या शहरात लॉकडाउन असला तरी ग्रामीण भागात दुकाने सुरू आहेत.

लासूर येथे काही दुकानांमध्ये काही घरी उंदरांचे पिंजरे ठेवले आहेत. याशिवाय प्राणीसंग्रहालयाच्या स्टोअर रूममध्ये मोठा पिंजरा ठेवण्यात आला आहे. उंदीर मिळण्यास काही अडचण नाही. बेडूक मात्र सायंकाळच्यावेळी रस्त्यावर, शेतमळ्यात जाऊन शोधून आणावे लागतात. आठवड्यातून एकदा मंगळवारी सर्पायलायाची सफाई करून त्यांना खाद्य दिले जाते. 

भूक असेल तरच अजगर खातो कोंबडी 

अजगरांसाठी आठवड्यातून चार बॉयलर कोंबड्या लागतात. महांडुळाला उंदीर टाकतो. मात्र, ते खाल्ले नाही तर त्याला कोंबडीचे अंडे द्यावे लागते. सापांसाठी दर आठवड्याला किमान ८० बेडूक आणि ३० उंदीर लागतात. बेडूक आणि कोंबडी पिंजऱ्यात जीवंत सोडतो तर उंदीर मारून टाकावे लागतात. अजगराला भूक असेल तरच तो कोंबडी खात असतो. मंगळवारी सापांच्या पिंजऱ्यात त्यांचे खाद्य टाकले जाते त्यांनी खाल्ले नाही तर दुसऱ्या दिवशी उंदीर काढून फेकून द्यावे लागतात तर बेडूक आणि कोंबडी शिल्लक असेल तर ते पुढच्या आठवड्यात दिले जाते. मात्र, उंदीर जिवंत सोडले तर ते पिंजऱ्यात बिळे तयार करण्याचा आणि त्यातून नंतर साप बाहेर पडण्याचा धोका असतो. म्हणून उंदीर मारून टाकावे लागत असल्याचे चार्ल्स बत्तिसे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com