जालना शहरातील चाळीस मार्ग बंद 

उमेश वाघमारे 
शनिवार, 11 जुलै 2020

दहा दिवसांच्या लॉकडाउनदरम्यान पोलिस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील तब्बल ४० मार्ग बंद केले आहेत, तर दुसरीकडे शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 

जालना - शहरात लागू केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाउनदरम्यान पोलिस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील तब्बल ४० मार्ग बंद केले आहेत, तर दुसरीकडे शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 

जालना शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान केवळ वैद्यकीय सेवा शहरात सुरू ठेवण्यात आली आहे. इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी विनाकारण शहरात फिरू नये म्हणून पोलिस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील तब्बल ४० मार्ग बंद केले आहेत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

नगरपालिकेकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्‍स लावण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शहराला प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली आहे. मात्र, शहरात अंतर्गत रस्ते बंद असल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही आटोक्यात आल्याचे चित्र आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

जुना जालना व नवीन जालना शहराला जोडणारे सर्व पूल शहरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. मात्र, हे पूल बंद केल्याने पोलिस प्रशासनासह रुग्णवाहिकेला जाण्या-येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शहरातील रामतीर्थ पुलाच्या बाजूला असलेला छोटा पूल व राजमहल चित्रपटगृह परिसरातील पूल पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन जालन्यातून जुना जालन्यात जाण्यासाठी आता हे दोन मार्ग आहेत. 

पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे शहरअंतर्गत मार्ग बंद करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास ४० मार्गांवर बॅरिकेड्‍स लावून बंद करण्यात आले आहेत. 
- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका

 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty roads closed in Jalna