उदगीरमध्ये निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला चाळीस कर्मचाऱ्यांची दांडी

युवराज धोतरे
Monday, 28 December 2020

उदगीर तालुक्यातील एकसष्ठ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे.

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील एकसष्ठ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. या अंतर्गत निवडणूक विभागाने आयोजित केलेल्या पहिल्याच प्रशिक्षणाला तब्बल चाळीस कर्मचाऱ्यांनी अनुपस्थिती नोंदवून दांडी मारली आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या एकसष्ठ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विभाग निवडणूक घेण्यासाठीची जोरदार तयारी सुरू केली असून सोमवारी (ता.२८) येथील भागीरथी मंगल कार्यालय व श्री हावगीस्वामी  महाविद्यालयात पहिले प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित केले होते.

 

 

या निवडणुकीसाठी एकूण पीआरओ ३६८ पैकी ०७ अनुपस्थित, मतदान अधिकारी क्रमांक एक ३५६ पैकी १३ अनुपस्थित, मतदान अधिकारी क्रमांक दोन ३५८ पैकी ०८ अनुपस्थित, मतदान अधिकारी क्रमांक तीन ३४९ पैकी १२ अनुपस्थित असे एकुण ४० कर्मचारी या प्रशिक्षणात अनुपस्थित होते.
पहिले पीपीटी प्रशिक्षण येथील भागीरथी मंगल कार्यालयात उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या उपस्थितीत तहसीलदार रामेश्वर गोरे व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिले तर श्री हावगीस्वामी महाविद्यालयात मशीनचे सर्व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

 

 
 

दांडी बहाद्दरांना नोटीस देणार
पहिल्या प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन जाब विचारण्यात येणार आहे. समाधानकारक बाब आढळली नसल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रमाण कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली आहे.

 

 

 

एकशे शहाण्णव नामनिर्देशनपत्र दाखल
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ८८ पुरुष,  तर १०८  महिला उमेदवार अशा एकुण १९६ जणानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण ११३ महिला तर  १०० पुरुष उमेदवार असे एकूण २१३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात प्रामुख्याने वाढवणा (खू) २९, निडेबन ३२, हेर १६, कुमठा १३, हंडरगुळी १९ या ग्रामपंचायतीसाठी जास्त उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty Staff Members Absent For First Election Training Udgir News