esakal | लातूरकरांसमोर म्युकरमायकोसिसचे नवे संकट, चौघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा


लातूरकरांसमोर म्युकरमायकोसिसचे नवे संकट, चौघांचा मृत्यू

आतापर्यंत चौघांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आजार देखील गंभीरच आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडणारे आहे.

लातूरकरांसमोर म्युकरमायकोसिसचे नवे संकट, चौघांचा मृत्यू

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : कोरोनाचे (Corona) संकट अद्यापही घोंघावत असतानाच म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) नवे संकट लातूरकरांसमोर उभे राहिले आहे. या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. इतकेच नव्हे तर या आजारामुळे रुग्ण बळीही पडत आहेत. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३६ जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून, ८१ जणांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये (Lock Down) शिथिलता आली असल्याने नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरत आहेत. पण, अद्याप धोका कायम असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा: 'पीएम केअर्स'च्या १७ व्हेंटिलेटर्समध्ये त्रुटी

जिल्ह्यात (Latur) कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूचा आकडा दोन हजाराच्या घरात गेला आहे. हे संकट अद्याप सुरुच आहे. असे असतानाच आता म्युकरमायकोसिसचे नवे संकट लातूरकरांसमोर उभे राहिले आहे. या आजाराच्या रुग्ण संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३६ जणांना हा आजार झाला आहे. सध्या ८१ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील २४ जण हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (Vilasrao Deshmukh Government Institute Of Medical Sciences) उपचार घेत आहेत. तर उर्वरित खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत चौघांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आजार देखील गंभीरच आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडणारे आहे.

खासगीला इंजेक्शनचा पुरवठा बंद

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसेविर या इंजेक्शनच्या तुटवडा अजूनही सुरुच आहे. प्रशासन त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासना मार्फतच खासगी रुग्णालयाला हे इंजेक्शन दिले जात आहे. आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना ॲम्फोटेरिसीन बी या इंजेक्शनची गरज आहे. त्याचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आतापर्यंत खासगी रुग्णालयांना या इंजेक्शनचा पुरवठा केला जात होता. पण, इंजेक्शन उपलब्ध नसल्याने गेल्या दोन दिवसापासून तो बंद करण्यात आला आहे.

कोरोना सारखेच म्युकरमायकोसिसमध्ये देखील नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. तसेच कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे. या आजारामुळे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. १३६ जणांना लागण झाली असून, ८१ जणांवर उपचार सुरु आहेत. या आजारासाठी लागणारे ॲम्फोटेरिसीन बी या इंजेक्शनचा तुटवडा आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाच्या वतीने ४३५ इंजेक्शन खासगी रुग्णालयाला देण्यात आले आहेत. शासनाकडेही जिल्ह्यासाठी तीन हजार इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर