लातूर : एमआयडीसीत चिमुकलीला बाधा, अहमदपूरचा रुग्ण गंभीर

सुशांत सांगवे
शनिवार, 23 मे 2020

जिल्ह्यात शनिवारी (ता. 23) एकूण 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत.

लातूर :  मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांमुळे लातूरातील कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लेबर कॉलनीनंतर आता शहरातील एमआयडीसी भागातील हाडको कॉलनीत नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यासह जिल्ह्यात शनिवारी (ता. 23) एकूण 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 84 झाली असून 45 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील 91 व्यक्तींचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यातील 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर एका व्यक्तीचा अहवाल अंतिम आला नाही. पॉझिटिव्ह आलेल्या दोनपैकी एक रुग्ण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील असून त्याची प्रकृती रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती.

घाबरू नका - तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार 

रुग्णालयात दाखल होताना रक्तदाब कमी होता व त्यांना मागील दोन वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार होता. त्यावर उपचार सुरू होते. सद्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरा रुग्ण ही लातूरमधील एमआयडीसी भागातील 6 वर्षाची मुलगी आहे. तिला ताप व निमोनिया असून तिची प्रकृती स्थिर आहे. ती उपचाराला प्रतिसाद देत आहे. तिच्यासह तिच्या घरातील तिच्यासह 4 जण नुकतेच मुंबईवरून लातुरात आले आहेत. त्यामुळे या मुलीच्या कुटुंबियांचीही तपासणी केली जाणार आहे.

मानलं बुवा - शिक्षण बारावी, हाताखाली वीस इंजिनिअर अन् टर्न ओव्हर... 

 उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथुन एकुण 20 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रेणापूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत. जळकोट येथुन 2 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी दोन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मुरुड येथील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. कासारशिरसी येथील 2 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

 

कोरोना मीटर

  • एकूण बाधित : 84
  • उपचार सुरू : 45
  • बरे झालेले : 36
  • मृत्यू : 03

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four new cases of Covid-19 reported in Latur dist