लातुरात चार चोरांकडून २५ मोबाईल जप्त

हरी तुगावकर
Monday, 10 August 2020

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; दोन अल्पवयीन मुले 

 लातूर - शहरात काही दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. यात मोबाईल चोरटे शोधण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. यात चौघांकडून २५ मोबाईल व चोरलेली एक मोटारसायकल असा एकूण चार लाख दोन हजार आठशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुले असून, त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे, तर दोघांना अटक करण्यात आली आहे. 

येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेल्या महिन्यात ५९ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे हे करीत होते. यात त्यांना सायबर कक्षाचीही मदत झाली. सुरवातीला हा मोबाईल जयभीमनगर येथील बाबासाहेब वाघमारे याच्याकडे असल्याची माहिती श्री. घाडगे यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्याला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने म्हाडा कॉलनीतील सूरज ऊर्फ भैया मधुकर मोरे याच्याकडून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.

श्री. घाडगे यांनी या सूरजला अटक केली. दोन अल्पवयीन मुलांच्या साहाय्याने सूरजने शहरातील अनेक ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे तपासात पुढे आले. यात पोलिसांनी अधिक तपास करून २५ मोबाईल व चोरलेली मोटारसायकल असा एकूण चार लाख दोन हजार आठशे रुपयांचा माल जप्त केला आहे. 

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा...  

यातील चोरट्यांनी मार्चमध्ये येथील बसवेश्वर चौकातून एक मोटारसायकल चोरली. त्यावर खोटीच नंबर प्लेटही टाकली. मोबाईल चोरताना याच मोटारसायकलचा ते सातत्याने वापर करीत असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे श्री. घाडगे यांनी सांगितले.  यात सूरज हा दोन अल्पवयीन मुलांच्या साह्याने मोबाईल चोरून आणत. त्यानंतर तो बाबासाहेब वाघमारे याला चोरलेले मोबाईल देत. चोरलेले मोबाईल विक्रीची जबाबदारी ही बाबासाहेब याच्यावर असायची. यात सूरजला दोन ते चार हजार रुपयांपर्यंतच पैसे दिले जात होते.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले यूूपीएससीत यश 

उर्वरित सर्व पैसे हा बाबासाहेब घेत. यात मोबाईल विकताना पावतीऐवजी आपल्या आधारकार्डवर हा मोबाईल माझाच आहे, असे लिहून तो विकला जात असल्याचेही तपासात पुढे आले आहे. ज्यांनी ज्यांनी हे चोरीचे मोबाईल विकत घेतले त्यांच्याकडून हे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती श्री. घाडगे यांनी दिली. या चोरांना पकडण्यासाठी श्री. घाडगे यांच्यासोबतच पोलिस नाईक दत्ता शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल धैर्यशील मुळे व सायबर शाखेचे गणेश साठे यांनीही पुढाकार घेतला. 

(संपादन : विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thieves arrested at Latur