परभणीतील सुगंधी बाजार 'लाख' मोलाचा 

गणेश पांडे
Tuesday, 2 February 2021

अशा या सुगंधीत अत्तरांबद्दलची माहिती व अत्तर आणि सेंट यामधील फरक जाणून घेऊया.

परभणी ः मनुष्याचे मन आल्हाददायक व प्रसन्न करण्यासाठी फार प्राचीन काळापासून सुगंधी द्रव्य (अत्तर) वापरले जाते. परभणीत या अत्तर, सेंट, बॉडी स्प्रे, कार स्प्रे, हेअर स्प्रे, रूम फ्रेशनर यांची मोठी बाजारपेठच निर्माण झाली आहे. याची रोजची उलाढाल लाखो रुपये इतकी आहे. अशा या सुगंधीत अत्तरांबद्दलची माहिती व अत्तर आणि सेंट यामधील फरक जाणून घेऊया.

अत्तर हे सुगंधी वनस्पतींच्या विविध भागांपासून जसे खोड, फूल यांचा उकळून अर्क काढून त्यापासून तेल तयार केले जाते. त्यांच्या विविध सुवासानुसार ही अत्तरे एक वर्षापासून जास्तीत जास्त दहा वर्षांपर्यंत टिकवून ठेवली जातात. अत्तर हे कमी प्रमाणात झाडांपासून मिळतात. त्यामुळे त्यांचे बाजारातील मूल्य अधिक असते. निजामशाहीतील लोक हैदराबादमधील ‘जास्मिन’ अत्तराचे शौकीन होते. पूर्वी पाहुण्यांना निरोप देताना अत्तर भेट म्हणून दिले जात असे. ही अत्तरे काचेच्या रंगीत चकाकणाऱ्या छोट्या अत्तरदानितून दिली जात होती. भारतात काही हजार वर्षांपासून अत्तर वापरले जाते.

अत्तराचा शोध ऋतुमानानुसार

पूर्वी अत्तरांचा शोध त्या-त्या ऋतूनुसार, त्या-त्या फुलांपासून व फळांपासून अत्तर मिळविले जात होते. संस्कृत साहित्यामध्ये अत्तराचा उल्लेख आहे. त्यामध्ये ‘गंधयुक्ती’मधून अत्तर तयार करण्याची प्रक्रियाच सांगितली आहे. अत्तर व सेंटमधील फरकअत्तर हे फुलांच्या, वनस्पतींच्या तेलांपासून बनविले जाते. ते अल्कोलरहित असल्याकारणाने त्याचा वापर शरीरावर थेटरीत्या केला जातो. त्यामध्ये हाताच्या मनगटावर, मानेवर, काखेत केला जातो. त्याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही.

सेंट, अत्तर व बॉडीस्प्रे

सेंट जे अल्कोल वापरून व रासायनिक पदार्थ वापरून करतात. सेंटच्या तुलनेत अत्तर हे अत्यल्प प्रमाणात वापरतात. कारण अत्तराचा वास उग्र असतो. सेंट कपड्यांवर मारतात, तर अत्तर हाताच्या मनगटावर, मानेवर लावले जाते. बॉडी स्प्रे थेट शरीरावर मारली जातात. प्राचीन काळात भारतात अत्तर केवळ राजे-महाराजेच वापरत होते. याशिवाय देवळांमध्येही अत्तराचा वापर केला जात होता. मात्र, बदलत्या काळानुसार रोजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरामधून घाम मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो. त्यामुळे अंगाला एकप्रकारे दुर्गंधी येते. ही दुर्गंधी लपविण्यासाठी अत्तरांचा वापर केला जातो.

उन्हाळा सुरु होताच बॉडी स्प्रेची मागणी

आजच्या धावपळीच्या युगात दिवसभर घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी परफ्यूम, सेंट, अत्तर, बॉडी स्प्रे यांचा वापर अनिवार्य होत आहे. महिन्याच्या बजेटमध्ये अत्तरांच्या प्रकारांसाठी वेगळे बजेट काढले जाते. रोजची गरज म्हणून गिऱ्हाईक या वस्तू खरेदी करतात. परंतू आता उन्हाळा सुरु होत असल्याने बॉडी स्प्रेची मागणी जास्त वाढते असे व्यवसायीकांनी सांगितले.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fragrance market in Parbhani worth 'lakh' parbhani news