esakal | बीडमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभागाला भरभरून निधी 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागासाठी आवश्यक उपकरणांची खरेदी आणि इतर कामांसाठी ११ कोटी आठ लाख रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

बीडमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभागाला भरभरून निधी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा बीड पॅटर्न यशस्वी झाला आहे. आता वेळ लढण्याची आली असून यात आरोग्य विभाग सक्षम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या विभागाला आता निधीही भरभरून मिळत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागासाठी आवश्यक उपकरणांची खरेदी आणि इतर कामांसाठी ११ कोटी आठ लाख रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

दरम्यान, याच विभागासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा व आमदार विनायक मेटे यांनीही आपल्या स्थानिक विकास निधीतून मोठी रक्कम उपलब्ध करून दिली आहे. या निधीतून आता जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्डांची उभारणी करण्यासह कोरोना विषाणूवरील उपचारासाठी यंत्रसामग्री, व्हेंटिलेटर्स, औषधी साठा मुबलक खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसाठी आठ कोटी ४५ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, औषधी साठा, पीपीई किट, कोरोना चाचणी किट यांसह विविध सामग्रीसाठी दोन कोटी ६३ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देऊन वितरित करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालयात औषधी, यंत्रसामग्री, १० व्हेंटिलेटर्स, एन-९५ मास्क, कोरोना किट, पीपीई किट आदी सामग्रीसाठी एक कोटी ४८ लाख रुपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - परळीतील एक लाखावर वीटभट्टी कामगार आर्थिक संकटात

उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत विलगीकरण कक्ष स्थापन करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, एक लाख ट्रिपल लेयर मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, अडल्ट व्हेंटिलेटर्स यांसह विविध साधनसामग्री साठी तीन कोटी १५ लक्ष रुपये निधी खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यातील ५९ लाख रुपये हे औषध व तत्सम खरेदीसाठी राखून ठेवण्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - यंदा हाताला मेहंदी नव्हे, सॅनिटायझर लावण्याची वेळ

अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात १० अडल्ट व्हेंटिलेटर्ससाठी एक कोटी १४ लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. स्वाराती आवारात आयसोलेशन वॉर्ड व विद्युतीकरण कामासाठी ७१ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात पाण्यासाठी आरओ, व्हीलचेअर्स, व्हॅक्युम क्लिनर्स, ब्लड कलेक्शन व्हॅन, ट्रान्स्पोर्ट व्हॅन, पीपीई किट, सुरक्षा किट यांसारख्या साधनसामग्रीसाठी तीन कोटी २१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

लोकप्रतिनिधींकडूनही निधी 
आगामी लढाई ही आरोग्य विभागाच्या जोरावर लढायची आहे. यामुळे उपकरणांसह डॉक्टर्स, नर्स व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, एन- ९५ मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज आदी सुरक्षा उपकरणांची गरज आहे. त्यामुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा व आमदार विनायक मेटे यांनीही यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून भरभरून रक्कम उपलब्ध करून दिली आहे.