कचरावेचक महिला निघाल्या बॅटऱ्या चोर, बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील चोरी प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

कचरा गोळा करणाऱ्या तीन महिलांनीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पाच्या बॅटऱ्यांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. बॅटऱ्या चोरणाऱ्या तीन महिला आणि त्या खरेदी करणारा भंगार दुकानदारास पोलिसांनी जेरबंद केले.

बीड - जिल्हाधिकारी कार्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पाच्या बॅटरी चोरणाऱ्यांचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. कचरा गोळा करणाऱ्या तीन महिलांनीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सौरऊर्जा प्रकल्पाच्या बॅटऱ्यांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. बॅटऱ्या चोरणाऱ्या तीन महिला आणि त्या खरेदी करणारा भंगार दुकानदारास पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. 

विजयमाला डिगांबर लोंढे (वय ४०), संगीता गंगाधर काळे (वय ३५), यशश्री नामदेव रोकडे (वय ४०) (सर्व प्रकाश आंबेडकरनगर, इमामपूर रोड, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या बॅटऱ्या चोरणाऱ्या महिलांची नावे आहेत. तर या चोरीच्या बॅटऱ्या खरेदी करणारा भंगार दुकानदार शेख जाफर बाबामियाँ यासही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या ८५ बॅटऱ्या (किंमत आठ लाख १० रुपये) चोरीची घटना घडली होती. येथील बॅटऱ्या चोरीची ही दुसरी वेळ होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

दरम्यान, कचरा गोळा करणाऱ्या तीन महिलांनी सौरऊर्जा प्रकल्पाच्या बॅटऱ्यांची पाहणी केली. नंतर कचरा गोळा करण्याचे निमित्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करत तेथील बॅटऱ्या असलेल्या रूमच्या खिडकीतून आतमध्ये जाऊन तेथील बॅटऱ्या खाली फेकल्या. पहाटेच्या सुमारास वॉचमन नसल्याची संधी साधून मिळेल त्या वाहनाने बॅटऱ्या चोरून नेल्याची कबुली आरोपी महिलांनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

या आरोपींकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, पोलिस उपनिरीक्षक संतोष जोंधळे, पोलिस कर्मचारी तुळजीराम जगताप, बालाजी दराडे, भास्कर केंद्रे, नसीर शेख, अन्वर शेख, जयश्री नरवडे, सोनाली जाधवर, कोमल नाईकवाडे, राजू वंजारे यांनी सहभाग घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage picker women go out batteries thieves