त्वरीत पैसे मिळण्यासाठी  जाचक अटीला शेतकऱ्यांचा ‘खो’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

सेनगाव तालुक्‍यातील चित्र
बाजार समितीकडे तुरीची विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल

सेनगाव ः तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचा माल शासकीय हमी भावाने खरेदी करण्यासाठी नाफेडने चार ठिकाणी केंद्र उभारले आहेत. त्यापैकी जवळा बुद्रुक येथील केंद्राचा सोमवारी (ता. १६) शुभारंभ झाला. दरम्यान, जाचक अटी व पैशाला लागणाऱ्या विलंबामुळे बहुतांशी शेतकऱ्यांचा बाजार समितीकडे तुरीची विक्री करण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. चारही केंद्रावर साडेचार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख हंगाम खरीप आहे. यामध्ये सोयाबीन व तूर हे प्रमुख पिके घेतली जातात. या वर्षी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची शासन हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडची कोळसा, सेनगाव, साखरा, जवळा बुद्रुक अशा चार ठिकाणी केंद्र मंजूर झाली आहेत. या चारही केंद्रांवर आजपर्यंत ४६२५ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षी हमीभाव केंद्रावर तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे लवकर मिळाले नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी सरळ बाजार समितीकडे माल विक्रीवर भर दिला आहे.

हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
कृषी उत्पन्न बाजार समिती व संत नामदेव बाजार समिती या दोन्ही ठिकाणी प्रतिदिन जवळपास दोन हजार क्विंटल तुरीची आवक होत आहे. नाफेडच्या शासन हमीभाव केंद्रावर हेक्‍टरी सहा क्विंटल तूर खरेदीची जाचक अट व शिवाय साधारणत तीन आठवड्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतात. या गोष्टीमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या उलट बाजार समितीत मालविक्री केल्यावर तत्काळ शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळतात. तुरीला शासन हमी भाव ५८०० रुपये असला तरीही शेतकरी व्यापाऱ्यांकडे ५००० रुपये प्रतिक्‍विंटल दराने माल विक्री करून मोकळे होत आहेत.

हेही वाचा - ‘सिध्देश्वर’चे पाणी ‘पुर्णे’च्या पात्रात

अटी शेतकऱ्यांसाठी गैरसोयीच्या
दरवर्षी शेतकरी शेतीमाल शासन हमी भावाने खरेदी व्हावा यासाठी नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मागणी करतात. मात्र, जाचक अटी व विलंबाने मिळणाऱ्या पैशामुळे या वर्षी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद खरेदी केंद्राला मिळत नाही. दरम्यान, या केंद्रावर माल मोजून दिल्यावर वेअर हाऊसला पोचल्यावर साधारण २१ दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील, असा नियम असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडे वाढल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्हा प्रशासन कॉफीमुक्तीसाठी सज्ज

लग्नसराईमुळे गरजेनुसार माल विक्री
या वर्षी सोयाबीन काढणी दरम्यान, झालेल्या अतिवृष्टीमुळे हे पीक हातचे गेले, शिवाय तुरीला अतिवृष्टीसह विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा फटका बसला आहे. सध्या लग्नसराई सुरू झाली असून तूर उत्पादक शेतकरी गरजेनुसार माल विक्री करू लागले आहेत. केंद्राचा सधन शेतकरी व व्यापाऱ्यांना जास्त लाभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोळसा (९७५), साखरा (८५०), सेनगाव (८००), जवळा बुद्रुक (दोन हजार), असे एकूण ४६२५ तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. १५ मार्चपर्यंत नोंदणी असल्यामुळे आणखी शेतकऱ्यांची नोंदणी होईल, असा अंदाज आहे.

नाफेडचे केंद्र लवकर सुरू होणे गरजेचे
तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाफेडचे हमीभाव केंद्र लवकर सुरू होणे गरजेचे होते. उशिरा सुरू होणारे केंद्र व जाचक अटींमुळे नाईलाजास्तव गरजू शेतकरी बाजार समितीकडे माल विक्री करून मोकळे होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शकपणे कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणी झाली की त्याचा फायदा होतो. - जितू देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To get paid quickly Farmers 'lose' on favorable terms