‘कोरोना जावो, हाताला काम मिळो’; घिसडी समाजाची आर्त हाक

Nanded News
Nanded News

नांदेड : सध्या भारतासह महाराष्ट्रात ‘कोरोना’ने दहशत निर्माण केली आहे. लॉकडाउनमुळे अनेक रोजगार कामावरून घरी बसले असून हातावर पोट असणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. अशाच दररोज विळा-कोयते शेवटून (धार देऊन) मिळेल ते काम करणाऱ्या घिसडी समाजबांधवांची हाताला काम मिळत नसल्यामुळे चांगलीच आबाळ होत असल्याचे दिसून येत आहे.   

भारत बहुविध समाजबांधवांनी नटलेला आहे. विविध जाती-धर्मांनी नटलेल्या या देशात प्रत्येकजण आपापल्‍या परीने व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवतो. काहींनी स्वतःच्या कार्यकुशलतेवर व्यवसायात बदल केला, तर अनेकजण अजूनही वंशपरंपरागत व्यवसायावर अवलंबून आहेत. यात सुतार, लोहार (घिसडी), सोनार, वारीक, नंदीवाले, बहुरूपी असे अनेक वडिलोपार्जित व्यवसाय आजही अनेकजण जोपासत असून त्यावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. असेच काही घिसडी बांधव व्यवसायासाठी काकांडी (ता. लोहा) या गावात काही दिवसांपासून आले आहेत. विळा, कुऱ्हाड, वखराची फास, नांगराचा फाळ अशी शेतउपयोगी साहित्य शेवटून (धार देऊन) यातून मिळालेल्या पैशातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवतात. 

शासनाने उपाययोजना कराव्यात 
या कामामध्ये त्यांचे सर्व कुटुंब गुंतलेले असून यावरच त्यांचे जीवन अवलंबून असते. मात्र, सध्या सर्वत्र ‘कोरोना’च्या पाश्‍वभूमीवर लॉकडाउन चालू आहे. त्यामुळे त्यांना काम मिळत नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना करून मदत करावी, अशी अपेक्षा त्यांच्यातून व्यक्त होत आहे.

लवकर ‘कोरोना’ जावो म्हणून लावले दिवे
मूळचे बळिरामपूर येथील घिसडी समाजाचे दगडू विजू सोळके यांचे नऊ-दहा जणांचे अख्खे कुटूंब मागील काही दिवसांपासून काकांडी (ता. लोहा) या ठिकाणी आले आहे. मात्र, मध्येच शासनाने लॉकडाउन घोषित केल्याने त्यांच्या हाताला काम मिळत नाही, तर संचारबंदी असल्याने गावही सोडता येत नाही. त्यामुळे लहान बालकांसह सर्व कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी रविवारी (ता. पाच एप्रिल २०२०) रात्री नऊ वाजता त्यांची उपजीविका भागविणाऱ्या भात्याभोवती मेणबत्या लावल्या व ‘लवकर देश कोरोना मुक्त होवो आणि आमच्या हाताला काम मिळो,’ अशी प्रार्थना केली.

खेडेगावांतही पुढे यावेत मदतीचे हात
शहरामध्ये अनेकजण गरजू, गरिबांसाठी पुढे येत आहेत. काही संसारोपयोगी किट, काही अन्नधान्य तर काही जेवणाचा डबा पुरवित आहेत. मात्र, खेडेगावांतही या घिसडी बांधवांसारखे अनेकांचे कामावाचून हाल होत आहे. त्यांच्यासह मुलाबाळांवरही उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे अशा गरीब, गरजूंसाठी ग्रामीण भागांतूनही मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com